नाशिक (प्रतिनिधी): कॉलेजमधील अल्पवयीन युवकांच्या दोन गटांत झालेल्या मारहाणीत शिवाजीनगर येथील पाझर तलावात बुडून मुद्फीर मेकरानी (वय १६, रा. संजीवनगर, अंबड लिंकरोड) या अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि. २७) दुपारच्या सुमारास घडली आहे.
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलं असून, तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविद्यालयात शिकणाच्या विद्यार्थ्यांच्या दोन गटांतील काही तरुण पाझर तलाव परिसरात आले होते. याचदरम्यान जुन्या वादातून दोन मुलांमध्ये हाणामारी झाली.
त्यात दोन्हीही मुले पाझर तलावात पडले. त्यानंतर उपस्थित मुलांनी साखळी करत पाण्यात उतरत मेकरानीला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही. ही घटना परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस उपायुक्त अमोल तांबे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक रियाझ शेख यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. त्यानंतर या ठिकाणी उपस्थित पाच अल्पवयीन मुलांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. अधिक तपास वरीष्ठ निरीक्षक रियाझ शेख करत आहेत.