नाशिक (प्रतिनिधी): गेल्या काही दिवसांपासून जुने नाशिक परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना पिण्याचे पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. अनेकदा तक्रारी करूनही पाण्याचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा शिल्लक असताना ही पूर्व विभागातील काही प्रभागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. महापालिकेच्या पूर्व विभागातील जुने नाशिकमधील बागवानपुरा, चौकमंडई, कथडा, मोठा राजवाडा, आझाद चौक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून, शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचत नसल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. काही भागात तर नागरिकांना स्वखर्चातून टँकर मागवावा लागत असल्याने नागरिकांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांवर रोष व्यक्त केला आहे.
धात्रक फाटा परिसरातही ठणठणाट:
दरम्यान, धात्रक फाटा परिसरातही गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. याबाबत पालिकेच्या संबंधित विभागाकडे नागरिकांनी तक्रार करूनही काहीही उपयोग होत नसल्याचे महिलांनी सांगितले. परिसरात जलकुंभ असूनही कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. परिसरात नव्याने झालेले रोहाउस आणि कॉलनी परिसरात ही समस्या अधिक आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे.
कॉलेजरोडला कमी दाबाने पाणी:
कॉलेज परिसरातील कल्पनानगर, येवलेकर मळा परिसरात इमारतींमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. परिसरात अवेळी पाणीपुरवठ्याच्या तक्रारी असताना आता कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. अवेळी पाणीपुरवठ्याने महिलावर्गाचे कामाचे नियोजन कोलमडले आहे. नोकरदार महिलांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. मनपा प्रशासनाने पाणीपुरवठा सुरळीत केला नाही तर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा नागरिकांनी िदला आहे.