नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात महापालिकेने लसीकरण केंद्रांची संख्या वाढवली असून ती आता २० वर नेण्यात आली आहे. त्यामुळे आता अनेक भागात घराजवळ लस उपलब्ध होणार आहे. शहरात कोरोनाबाधीतांची संख्या वाढू लागल्यानंतर आता नागरिकांकडून लसीकरणासाठी विचारणा होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेने लसीकरण केंद्रे वाढवण्याचा हा निर्णय घेतल्याची माहिती मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली
शहरात महापालिकेच्या २० आणि कास्गी १६ रुग्णालयात लसीकरण सुरु आहे. महापालिकेच्या वतीने सातपूर येथील ईएसआयएस रुग्णालय, रविवार कारंजा येथील रेडक्रॉस, पंचवटीतील मायको, रामवाडी, उपनगर, सिडको, पिंपळगाव खांब, वडाळा गाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, नाशिकरोड येथील जेडीसी बिटको, इंदिरा गांधी रुग्णालय, नवीन बिटको रुग्णालय, गंगापूर रुग्णालय, अंबड, मखमलाबाद, भारतनगर, दसक पंचक, एमएचबी कॉलनी, मायको सातपूर, सिन्नर पहाता, जिजामाता प्राथमिक आरोग्य केंद्र येथे लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे.