नाशिक (प्रतिनिधी): महापालिका क्षेत्रात कोरोना आटोक्यात आला असला तरी बाधित रुग्णांना कालांतराने विविध आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागत असल्यामुळे त्यांच्यावर उपचारासाठी शहरातील सहाही विभागांमध्ये बाह्यरुग्ण विभाग सुरू करून उपचार केले जाणार असल्याची माहिती पालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिली.
नाशिकमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार उडवला. २४ मार्च ते १ मे यादरम्यान जवळपास एक लाख नवीन कोरोना रुग्ण सापडले. दुसऱ्या लाटेतून सावरत असताना म्युकरमायकोसिससारख्या गंभीर आजाराचे रुग्ण आढळू लागल्यामुळे पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण तयार झाले. कोरोनाबाधितांना कालांतराने विविध शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागत असून काहींना हृदयविकार तसेच अन्य गंभीर आजारदेखील होत आहे.
काहींना सौम्य त्रासाचा सामना करावा लागत असून प्रामुख्याने अंगदुखी व अशक्तपणा याचा समावेश आहे. त्यापासून रुग्णांना आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागू नये तसेच वेळीच त्यांच्यावर उपचार करता यावे यासाठी महापालिकेने सहा बाह्यरुग्ण विभाग सुरू करून उपचार करण्याची सुविधा दिली आहे.
येथे होणार उपचार:
पूर्व विभाग : डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय (डॉ. नितीन रावते), {नासिकरोड विभाग : जेडीसी बिटको रुग्णालय (डॉ. शिल्पा काळे), पंचवटी विभाग : इंदिरा गांधी रुग्णालय (डॉ. विजय देवकर), नवीन नाशिक विभाग : श्री स्वामी समर्थ रुग्णालय (डॉ. नवीन बाजी), सातपूर विभाग : गंगापूर रुग्णालय (डॉ. योगेश कोशिरे), नाशिक पश्चिम विभाग : जिजामाता रुग्णालय (डॉ. स्वाती सावंत)