नाशिक (प्रतिनिधी): नवीन नाशिक विभागातील हॉटेल, भाजी मार्केटला मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी अचानक भेटी देऊन नियमांचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. नाशिक शहर व परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असून शासनाच्या निर्देशानुसार नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी शनिवारी कॉलेज रोड व परिसरात अचानक पाहणी केली होती. त्याचप्रमाणे सलग दुसऱ्या दिवशी रविवारी रात्री नवीन नाशिक परिसरातील शिवाजी चौक, लेखा नगर,राणे नगर परिसरातील भाजी मार्केट व आदी भागाची पाहणी केली. यावेळी मास्क परिधान करणे बाबतचे नियम न पाळल्याबद्दल ३० जणांवर कारवाई करण्यात आली.
तसेच नवीन नाशिक परिसरातील हॉटेल स्पेन्स लेखानगर,हॉटेल उत्तम हिरा चावडी, लेखानगर व हॉटेल सचिन,लेखानगर या तीन हॉटेलमध्ये कोरोनाबाबतच्या नियमांचे उल्लंघन झाल्याप्रकरणी प्रत्येकी पाच हजार रुपये दंड करण्यात आला आहे
या पाहणीच्या वेळी आयुक्त कैलास जाधव यांच्या समवेत घनकचरा व्यवस्थापन संचालिका डॉ.कल्पना कुटे, विभागीय अधिकारी मयुर पाटील, अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निंबाळकर आदी उपस्थित होते.