नाशिकरोडला समाजकंटकांकडून सहा ते सात चारचाकी वाहनांची तोडफोड

नाशिक (प्रतिनिधी): येथे समाजकंटकांकडून वाहनांच्या तोडफोडीचे सत्र अद्यापही सुरूच असून रविवारी मध्यरात्री देवळाली गाव व परिसरात अज्ञात समाजकंटकांनी सहा ते सात चारचाकी वाहनांच्या काचा फोडून तोडफोड केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा समाजकंटकांनी व गुंडांनी डोकेवर काढल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

एक ते दोन महिन्यांपूर्वी विहितगाव व धोंगडेनगर परिसरात अज्ञात समाजकंटकांनी गाड्यांची जाळपोळ व तोडफोड केली होती. या घटनेप्रकरणी उपनगर पोलीसांनी तातडीने तपास करून संबंधित समाजकंटकांना अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई केली होती.

👉 हे ही वाचा:  नाशिकमध्ये दोन टोळ्यांतील चकमक प्रकरणी ६ आरोपी पकडले; २ गावठी कट्टे, स्विफ्ट कार जप्त

त्यानंतर मात्र समाजकंटक व गुंड घाबरले होते. मात्र, रविवारी रात्री अचानकपणे गुंडांनी डोकेवर काढले व देवळाली गाव परिसरात पार्क असलेल्या गाड्यांची तोडफोड केली. सध्या सार्वजनिक गणेशोत्सवचे दिवस असताना सुद्धा समाजकंटकांनी एकप्रकारे पोलिसांना आवाहन दिल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

या समाजकंटकांनी देवळाली गाव येथे राहणारे किशोर शिसोदे फेटेवाले यांची एम एच १५ सीएम ५६२६ या क्रमांकाची टाटा नॅनो तसेच योगेश्वर नगर विहितगाव वडनेररोड येथील विशाल लक्ष्मण बोरसे यांची एम एच ०४ सीसी झेड १० या क्रमांकाचे व्हॅगनार गाडी, शिवकमल सर्विसेस सेंटरचे राजेंद्र बोराडे यांची एमएच १५ एचजी १६१२ तसेच भैरवनाथ मंदिर वडनेररोड येथील संजय पोरजे यांची एमएच ०४ एफ झेड ६७६२ वडनेर रोड येथील मच्छिंद्र कोठुळे यांची छोटा हत्ती वाहनाची काच फोडण्यात आली. त्याचप्रमाणे एमएच ०३ त्या मारुती व्हॅनचे नुकसान करण्यात आले.

👉 हे ही वाचा:  राज्यातील 'या' जिल्ह्यांना आज (दि. १० जुलै) पावसाचा इशारा !

दरम्यान, या सर्व प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच याप्रकरणाचा पुढील तपास उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. याशिवाय सदरची तोडफोड कोणी केली किंवा या तोडफोडी मागे काही वैयक्तिक हेवे दावे आहे की राजकारण याबाबतचा तपास पोलीस घेत आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790