नाशिक (प्रतिनिधी): आठवडाभरापासून वातावरणातून गायब झालेला गारवा पुन्हा परतला आहे. पाऱ्यात घसरण झालेली असून, थंडीचा जोर वाढला. आज (दि. २० नोव्हेंबर २०२४) नाशिकचे किमान तापमान १२.४ अंश सेल्सियस, तर निफाडचे किमान तापमान १०.९ अंश सेल्सियस नोंदविले गेले आहे.
मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा किंचित स्वरूपात किमान तापमान घसरल्याची नोंद हवामान खात्याने घेतली आहे. ऑक्टोबर अखेरीस वातावरणात निर्माण झालेला गारवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कायम होता. मात्र, त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून पारा वाढून थंडीत घट झालेली होती. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजाप्रमाणे वातावरणात पुन्हा गारवा परतला असून, आता पुढील काही दिवस टिकून राहील.
सध्या वातावरण कोरडे राहत आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक थंड ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाडमध्येही गारठ्याचा जोर वाढला. किमान तापमान १०.९ अंश सेल्सियसपर्यंत नोंदविले गेले असून, पुढील काही दिवसांत एकआकडी तापमान नोंदविले जाण्याची शक्यता आहे.
चार अंशांनी घसरण:
शनिवारी (ता. १६) नाशिकचे किमान तापमान १६.८ अंश सेल्सियस नोंदविण्यात आले होते. अवघ्या तीन दिवसांत किमान तापमानात चार अंशांहून अधिकची घट नोंदविण्यात आली. कमाल तापमानातही घसरण झाली असून, मंगळवारी नाशिकचे कमाल तापमान २९.० अंश सेल्सियस नोंदविले गेले. बऱ्याच दिवसांनंतर कमाल तापमान ३० अंशांपेक्षा कमी राहिले आहे.