नाशिक (प्रतिनिधी): तीन ते चार दिवसांपूर्वी शहरात ढगाळ हवामान पहावयास मिळत होते; मात्र शनिवारपासून वातावरण पुन्हा बदलण्यास सुरुवात झाली आहे. पहाटे धुके पसरलेले दिसून आले, तर सायंकाळनंतर वातावरणात पुन्हा गारवा निर्माण होऊ लागला होता. किमान तापमान १६.६ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले.
निफाडला किमान तापमान १६.१ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. शहरातील ढगाळ हवामान शनिवारी मोठ्या प्रमाणात निवळल्याचे दिसून आले. पुन्हा हवामान कोरडे होण्यास सुरूवात झाली आहे. यामुळे सोमवारपासून थंडीचा कडाका नाशिककरांना जाणवू शकतो, असे हवामान अभ्यासकांचे म्हणणे आहे. शनिवारी सकाळी वातावरणात आर्द्रता ९१ तर सायंकाळी ४० टक्के इतकी नोंदविली गेली. कमाल तापमान २९.५ अंश सेल्सिअस इतके मोजण्यात आले.
मागील बुधवारी किमान तापमान सर्वाधिक २१.९ अंशापर्यंत मोजण्यात आले होते. त्यानंतर आता पारा पुन्हा घसरण्यास सुरूवात झाली आहे. शनिवारी तापमान थेय १६.६ अंशापर्यंत खाली आले. एकूणच मागील आठवड्यात अचानकपणे ८ अंशावरून २१ पर्यंत पोहचलेले किमान तापमान आता घसरू लागले आहे.
यामुळे थंडीची तीव्रता वाढण्याचे संकेत पुन्हा एकदा दिसू लागले आहे. शनिवारी रात्री साडेनऊ वाजेनंतर हवेत कमालीचा गारवा जाणवत होता. शनिवारी सायंकाळी ७ वाजता वाऱ्याची झुळूक लागत होती, तेव्हा रात्री थंडीचा कडाका वाढेल असे वाटू लागले. सायंकाळी ५ वाजेपासून गारवा अधिकच वाढला होता. त्यामुळे थंडीचे कमबॅक झाले आहे.