नाशिक। दि. १२ एप्रिल २०२६: शहरात यंदाच्या उन्हाळ्यातील आतापर्यंतचे सर्वाधिक ३८.८ अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान शनिवारी (दि. ११) नोंदविण्यात आले. अवघ्या ४८ तासांत तापमानात सुमारे ६.६ अंशांची लक्षणीय वाढ झाल्याने नागरिकांना तीव्र उष्णतेचा सामना करावा लागला. दिवसभर कडक उन्हामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले असून, दुपारी १ नंतर शहरातील रस्त्यांवरील वर्दळही कमी झाल्याचे चित्र दिसून आले.
हवामान विभागाने राज्यात पुन्हा उष्णतेची लाट वाढण्याचा इशारा दिला आहे. महिनाभरापूर्वी १२ मार्च रोजी नोंदविलेल्या तापमानाच्या पातळीवर पुन्हा पारा पोहोचल्याने उष्णतेची तीव्रता वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. शनिवारी सकाळपासूनच वातावरणात उकाडा जाणवत होता. रात्री उष्म्यामुळे नागरिकांना झोपही लागत नसल्याचे चित्र असून, दिवसाही उन्हापासून बचावासाठी विविध उपाययोजना करताना नागरिक दिसत आहेत.
कमाल तापमानातील ही झपाट्याने झालेली वाढ संभाव्य उष्णलाटेचे संकेत मानले जात आहेत. गेल्या आठवड्यात अवकाळी पावसाने जिल्ह्याला झोडपल्यानंतर आता पुन्हा सूर्याचे तीव्रतेने तडाखे जाणवू लागले आहेत. जमिनीवर कोसळणाऱ्या तीव्र सूर्यकिरणांमुळे उष्णतेची झळ अधिकच वाढली आहे.
कमाल तापमानासह किमान तापमानातसुद्धा वाढ होऊ लागली आहे. यामुळे नागरिकांना रात्री घरात बसणेसुद्धा कठीण झाले आहे. उकाड्यात मोठी वाढ झाल्याने रात्रीसुद्धा अस्वस्थता जाणवू लागली आहे. वाऱ्याचा वेग पूर्णतः मंदावल्यामुळे कमाल-किमान तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. मागील २४ तासांत किमान तापमानात २ अंशांनी वाढ झाली आहे. शनिवारी (दि.११) १९.३ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदविले गेले.
![]()

