नाशिक : मध्य नाशिक मतदारसंघाच्या विकासासाठी मी पाच वर्षांत अनेक महत्त्वाची कामे पूर्णत्वास नेली आहेत. अनेक कामे मंजूर आहेत. तर काही कामे सध्या सुरू आहेत. माझे प्रतिस्पर्धी असलेल्या उमेदवाराने त्याच्या आमदारकीच्या कार्यकाळात कोणती कामे केली? त्यांनी केलेले एक तरी मोठे काम दाखवले तरी मी एक लाखांचे बक्षीस देईल, असे आव्हान मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघाच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी केले.
हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर महायुतीचे उमेदवार आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली. या सभेत प्रारंभी देवयानी फरांदे यांनी विरोधकांवर हल्ला केला. ड्रग्जमुक्त नाशिकसाठी मीच सर्वप्रथम सभागृहात आवाज उठवला. याला देवेंद्र फडणवीस यांनी भक्कम पाठबळ दिले. देवेंद्र फडणवीस हे पहिले गृहमंत्री आहेत, ज्यांनी ड्रग्ञ्जमुक्त नाशिकसाठी कारवाईचा धडाका लावला. परंतु यामुळे विरोधकांचीच कोंडी झाल्यामुळे ते आपल्यावर धादांत खोटे आरोप करीत आहेत, असेही त्या म्हणाल्या.
यावेळी फरांदे म्हणाल्या की, मराठा आणि धनगर समाजासाठी राज्यातील सर्वात मोठे वसतिगृह मध्य नाशिक मतदारसंघात बांधले जात आहे. स्वा. सावरकर जलतरण तलाव, गंगापूर रोड येथे छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलाव अशी प्रचंड कामे केली. उलट विरोधकांनी महिला रुग्णालयाला आडकाठी आणली, असे सांगून त्यांनी स्वतः आमदार असताना पाच वर्षांत विधानसभेत यांनी केलेले एक भाषण दाखवावे, मी एक लाख ५१ हजार रुपयांचे बक्षीस देईल, असेही त्या म्हणाल्या.