नाशिक जिल्हा प्रशासन मतमोजणीसाठी सज्ज; अशी आहे तयारी…

नाशिक (प्रतिनिधी): महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत नाशिक जिल्ह्यात 69.12 टक्के मतदान झाले असून जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदारसंघासाठी शनिवार 23 नोव्हेंबर 2024 रोजी सकळी 8 वाजेपासून मतमोजणी सुरू होणार आहे. यासाठी 15 मतमोजणीच्या ठिकाणी आवश्यक तयारी झाली असून जिल्हा प्रशासन सज्ज आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी दिली आहे.

आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हा निवडणूक अधिकारी शर्मा बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, तहसीलदार (निवडणूक) शाम वाडकर यांच्यासह माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी शर्मा म्हणाले की, मतदानानंतर मतदान यंत्रे संबंधित विधानसभा मतदारसंघाच्या स्ट्राँग रूम मध्ये त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्थेत सीसीटीव्ही निगराणीखाली ठेवण्यात आलेले आहेत. मतमोजणी निरीक्षक यांचे उपस्थितीत ईव्हीएम मतमोजणीसाठी नियुक्त कर्मचारी यांची तिसरी सरमिसळ मतमोजणीच्या दिवशी 23 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 5 वाजता करण्यात येवून व संबंधित कर्मचाऱ्यांना टेबल नेमून देण्यात येणार आहे. मतमोजणीसाठी सकाळी 7.30 वाजता निवडणूक लढविणारे उमेदवार / प्रतिनिधी तसेच आयोगाकडून नियुक्त करणेत आलेले मतमोजणी निरिक्षक यांचे उपस्थितीत स्ट्राँग रूम उघडणेत येईल. लोकप्रतिनिधीत्व अधिनियम,1951 चे कलम 128 अन्वये निवडणूक निर्णय अधिकारी सर्व कर्मचा्-यांना व मतमोजणी प्रतिनिधींना गोपनीयतेची शपथ देतील. भारत निवडणूक आयोगाकडून 15 विधानसभा मतदारसंघ निहाय मतमोजणी निरीक्षक नियुक्त करणेत आलेले आहेत. त्यांच्या निगराणीखाली मतमोजणीची संपूर्ण प्रक्रीया पार पडणार आहे.

हे ही वाचा:  नाशिक: खाजगी बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; एक जण जखमी

सकाळी ठीक 8 वाजता टपाली मतपत्रिकांची मतमोजणी सुरू करणेत येणार आहे. त्यासाठी विधानसभा मतदारसंघ निहाय संभाव्य प्राप्त होणा-या टपाली मतपत्रिका लक्षात घेऊन टेबल्सची संख्या निश्चित करणेत आलेली आहे. प्रत्येक टेबलवर एक अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, एक मतमोजणी पर्यवेक्षक, 2 मतमोजणी सहायक व एक सूक्ष्म निरीक्षक यांची नेमणूक करण्यात आली आहे. प्रत्येक टेबलवर जास्तीत जास्त 500 टपाली मतपत्रिकांची मोजणी करण्यात येणार आहे. सैनिक मतदारांमार्फत मतदान करून टपालाने प्राप्त होणा-या मतपत्रिकांची मोजणी 23 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 8  वाजेपूर्वी  ETPBMS प्रणालीतून स्कॅनिंग करून करणेत येणार आहे. सकाळी ठीक 8 वाजता टपाली मतपत्रिकांची मतमोजणी सुरू झाल्यानंतर ईव्हीएम मतमोजणी प्रक्रीया 8.30 वाजता सुरू करण्यात येईल. याकरीता प्रत्येक टेबलवर एक मतमोजणी पर्यवेक्षक, 1 मतमोजणी सहायक व एक सूक्ष्म निरिक्षक यांची नेमणूक करणेत आर्लेली असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी शर्मा यांनी सांगितले.

हे ही वाचा:  नाशिक: शहरात महावितरणचे छापे; वीज चोरीचे गुन्हे दाखल !

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतमोजणी केंद्रात नियुक्त कर्मचारी व मतमोजणी प्रतिनिधी यांना मोबाईल व अन्य इलेक्ट्रॅानिक उपकरणे आणण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. केवळ मतमोजणी निरीक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी आणि ENCORE व ETPBMS करीता मान्यता दिलेल्या अधिका-यांना संबंधित कामकाजासाठी मोबाईल सोबत बाळगता येणार आहे. प्रत्येक फेरीनिहाय यादृच्छीक पद्धतीने दोन कंट्रोल युनिट (CU) निवडून त्यावरील उमेदवार निहाय मतांची खात्री  मतमोजणी निरीक्षकांकडून करण्यात येईल. प्रत्येक फेरीनंतर मतमोजणी निरीक्षक यांच्या मान्यतेने पडताळणी करून निवडणूक निर्णय अधिकारी उमेदवारनिहाय मिळालेल्या मतांची आकडेवारी घोषित करतील. फेरीनिहाय मिळालेल्या मतांची आकडेवारी आयोगाच्या ENCORE प्रणालीमध्ये भरणेत येणार असून निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर https://results.eci.gov.in विधानसभा मतदारसंघ फेरीनिहाय मिळालेल्या मतांची माहिती नागरिकांना उपलब्ध होणार आहे.

हे ही वाचा:  बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी तर दहावीची २१ फेब्रुवारीपासून

टेबलवरील मतमोजणी संपल्यानंतर निवडणूक निरीक्षक व उमेदवार / प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत यादृच्छीक पद्धतीने 5 मतदान केंद्र निवडून त्यांचे व्हीव्हीपॅट स्लिप्सची पडताळणी कंट्रोल युनिटवरील उमेदवारनिहाय मिळालेल्या मतांशी करण्यात येणार आहे. ईव्हीएम व टपाली मतपत्रिकांची मतमोजणी पूर्ण झालेनंतर निवडणूक निर्णय अधिकारी मतमोजणी निरिक्षक यांच्या मान्यतेने उमेदवार निहाय अंतिमत: प्राप्त मतांची आकडेवारी घोषित करतील निवडणूक निर्णय अधिकारी प्रत्येक फेरी नंतर पडताळणी करून उमेदवार निहाय मिळालेली मते अधिकृतरित्या जाहीर करतील. तसेच सर्व मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर मतमोजणी निरिक्षक यांच्या मान्यतेने अंतिम निकाल घोषित करतील.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790