नाशिक (प्रतिनिधी): विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक विभागातील सर्व जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात कोणत्याही प्रकारे गैरप्रकार होणार नाहीत, यासाठी बारकाईने नजर ठेवण्याचे निर्देश भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासाठी नियुक्त केलेले विशेष खर्च निरीक्षक बी. आर. बालकृष्णन यांनी दिले. विधानसभा क्षेत्रात नियुक्त करण्यात आलेल्या भरारी पथके, स्थिर सर्वेक्षण पथके यांच्यासह आवश्यक तेथे ड्रोनच्या माध्यमातूनही लक्ष ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
येथील जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात गुरुवारी बालकृष्णन यांनी आढावा बैठक घेतली. नाशिक जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रासाठी नियुक्त खर्च निरीक्षक सर्वश्री कॅस्ट्रो जयप्रकाश टी (आयआरएस), पेरियासामी एम (आयआरएस), श्रीमती गायत्री (आयआरएस), जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, उप जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे आदींची यावेळी उपस्थिती होती. दूरदृश्यप्रणालीद्वारे अहिल्यानगर, धुळे आणि जळगाव येथील विधानसभा क्षेत्रासाठीचे खर्च निरीक्षक, जिल्हा निवडणूक अधिकारी तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.
बालकृष्णन यांनी यावेळी खर्चविषयक बाबी तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवार अथवा राजकीय पक्षांच्या वतीने करण्यात येणाऱ्या प्रचाराकडे बारकाईने लक्ष देण्याची सूचना त्यांनी केली. मतदारसंघातील महत्वाचे रस्ते, ग्रामीण भागातील रस्ते आदी ठिकाणी सर्वेक्षण पथकांच्या माध्यमातून तपास मोहिम गतिमान करण्यात यावी. विशेषता मतदान प्रक्रिया जवळ येत असताना कोणत्याही प्रकारे अवैध मद्यवाटप, पैसे वाटप होणार नाही याकडेही लक्ष ठेवावे. आयकर विभाग, पोलीस, जीएसटी, राज्य उत्पादन शुल्क, अग्रणी बॅंक, सहकारी बॅंक, वन विभाग आदींनी त्यांच्या क्षेत्रात निवडणूक कालावधीत काहीही गैरप्रकार होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यावर तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. बॅंकामधील दैनंदिन स्वरुपात होणारे व्यवहार, विविध व्यवसायांच्या माध्यमातून होणारी उलाढाल यामध्ये अचानक वाढ झाल्याचे दिसून येत असल्यास त्यावर बारकाईने लक्ष ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
बालकृष्णन म्हणाले की, संवेदनशील क्षेत्रात होणाऱ्या घडामोडींकडे तेथे नियुक्त निवडणूक पथकांनी विशेष लक्ष ठेवावे. जिल्ह्यातील डिस्टीलरीज, तेथून होणारी मद्यार्क वाहतूक, परराज्यातून येणारी तसेच राज्यातून बाहेर जाणाऱ्या मद्यार्क वाहतुकीवरही लक्ष ठेवावे. जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या गोदामातील मालाची उपलब्धता आणि त्याची विक्री, वाहतूक यावरही बारकाईने लक्ष देण्याची सूचना त्यांनी केली. सोशल मीडियातून होणाऱ्या प्रचाराकडेही पोलीसांनी लक्ष देण्याची सूचना त्यांनी केली.
बैठकीस राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक एस. व्ही. गर्जे, जीएसटी विभागाचे अंजूम तडवी, अग्रणी बॅंक अधिकारी भिवा लवटे, जिल्हा उपनिबंधक फयाज मुलाणी, आयकर अधिकारी झुंझार पवार, पंकज कुमार, सीमाशुल्क विभागाचे प्रभाकर सिंग, वन विभागाचे नोडल अधिकारी संतोष सोनवणे, डाक विभागाचे प्रवर अधीक्षक प्रफुल वाणी, जिल्हा खर्च समितीचे नोडल अधिकारी दत्तात्रय पाथरूट, सहाय्यक नोडल, अधिकारी माधव थैल यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.