नाशिक (प्रतिनिधी): महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टीने स्वीप कार्यक्रमाच्या धर्तीवर भारत सरकार, सूचना व प्रसारण मंत्रालय अंतर्गत केंद्रीय संचार ब्यूरो, पुणे यांच्यावतीने 11 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर या या कालावधीत वाहनाद्वारे (व्हॅन) ही मोहीम राबविण्यात येत आहे.
या मोहीमेचा शुभारंभ 11 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातून जिल्हाधिकारी जलज शर्मा व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीप नोडल अधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून होणार आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.शशिकांत मंगरूळे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
नागरिकांना मतदानाचे महत्व पटवून देणे व 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदानासाठी प्रोत्साहित करणे हा या मोहीमेचा उद्देश असून कोणताही मतदार मागे राहू नये आणि यापेक्षा महत्वाचे काहीही नाही अशी या मोहीमेची संकल्पना आहे. या मोहीमेच्या शुभारंभ प्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात कलापथक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण होणार आहे. 11 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर या कालावधीत हे वाहन (व्हॅन) संपूर्ण नाशिक जिल्ह्यात फिरून मतदानाची जनजागृती करणार आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
![]()

