नाशिक (प्रतिनिधी): महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने बुधवार 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान होणार आहे. नाशिक जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीत 50 लाख 61 हजार 185 मतदरांनी नोंदणी केली असून सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजावून जिल्ह्याची मतदान टक्केवारीचे 75+ हे उद्दिष्ट साध्य करू या, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी नाशिक जिल्हावासियांना केले आहे.
बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदानासाठी शासनाने सुट्टी घोषित केली आहे. त्यामुळे कुटुंबातील ज्या व्यक्तींची नावे मतदार यादीत आहेत मात्र शिक्षण किंवा नोकरी/ व्यवसाय निमित्ताने ते अन्य ठिकाणी राहत असल्यास तिथे त्यांना पगारी रजेचा अधिकार आहे. या सदस्यांना लोकशाहीच्या या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी कुटुंबातील व्यक्तींनी प्रोत्साहित करावयाचे आहे.
मतदार चिठ्ठीवरून नागरिकांना आपले मतदान केंद्राची माहिती मिळाली असेल. परंतु जर ती प्राप्त झाली नसल्यास आयोगाच्या व्होटर हेल्पलाईन ॲपवरून आपले मतदान केंद्र व मतदान यादीतील अनुक्रमांक शोधणे सुलभ आहे.तसेच मतदान केंद्राच्या बाहेर आपले सहायता कक्षात मतदान केंद्र अधिकारी हे मतदारांना त्यांचे अनुक्रमांक शोधून देण्यास मदत करणार आहेत. मतदान केंद्रावर आवश्यक मुलभूत सेवा-सूविधा जसे पिण्याचे पाणी, मतदारांसाठी शेड, माहितीदर्शक फलक, टॉयलेट, व्हीलचेअर, पाळणाघर व स्वयंसेवक या उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
प्रत्येक विधानसभा मतदार संघात तीन संपूर्ण महिला संचलित मतदान केंद्र, एक संपूर्ण दिव्यांग कर्मचारी संचलित मतदान केंद्र आणि तीन संपूर्ण युवा कर्मचारी संचलित मतदान केंद्र देण्यात आलेले आहेत. जिल्हा प्रशासनाकडून मतदान प्रक्रियेच्या संनियंत्रणासाठी जिल्ह्यात 3280 मतदान केंद्रांचे वेबकास्टिंग करण्यात येणार आहे. मागील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी जिल्ह्यात 64.21 टक्के मतदान झाले आहे असून विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी नागरिकांनी अधिक उत्साहाने मतदान प्रक्रियेत सहभागी होवून 75 टक्के पेक्षा अधिक मतदानाचे उद्दिष्ट पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. शर्मा यांनी केले आहे.