नाशिक (प्रतिनिधी): त्र्यंबकेश्वर रोडवरील सीटाबेल चौफुलीवर वळण घेणाऱ्या खासगी बसला नाशिककडून सातपूरच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तो जागीच ठार झाला.
नाशिकच्या त्र्यंबक रोडवर दुचाकी आणि बसच्या अपघातात दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. त्र्यंबकरोडवर असलेल्या उज्ज्वल एजन्सीजवळील धोकादायक चौफुलीवर शनिवारी खासगी बस आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात दुचाकीचालक वैभव मच्छिंद्र देशमुख (२९ वय, रा. श्रमिकनगर, सातपूर) हा तरुण जागीच ठार झाला. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती दिली आहे. शनिवारी (दि. १२ ऑगस्ट ) दुपारी ३ वाजेच्या सुमारास सातपूर येथील आयटीआय जवळच्या एका कंपनीत नोकरीस असलेला वैभव देशमुख हा तरुण ( एमएच १५ एफपी ५१५१) या दुचाकीने सातपूरकडे येत असताना खासगी बस (एमएच १५ जेसी ०९०९) ची उज्ज्वल एजन्सी येथील चौफुलीजवळ दुचाकीला जोरदार धडक बसली. यात वैभवच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
इंजिनीअर वैभव हा मच्छिंद्र देशमुख यांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या बहिणीचे लग्न झालेले आहे. त्याचे वडील मालवाहतूक करणारी छोटी गाडी चालवतात. त्याच्या अपघाती जाण्याने देशमुख कुटुंबीयांवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर श्रमिकनगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघातात मृत्यू झालेल्या वैभवाच्या स्पोर्ट बाइकचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
दरम्यान, अपघात झाल्यानंतर अपघात स्थळी तरुणाच्या डोक्यात हेल्मेट असतं तर त्याचा जीव वाचला असता, अशी चर्चा सुरू होती. हेल्मेट घाला, असं आवाहन पोलिसांकडून वारंवार दुचाकी चालकांना केलं जातं. तसेच हेल्मेट न घालणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईही केली जाते. तरीही अनेक दुचाकीचालक विना हेल्मेट वाहन चालवत असतात.