नाशिक (प्रतिनिधी): शहराची लोकसंख्या, रस्त्यावरील वाहतूक आणि होणारी कोंडी पाहता, शहर पोलीस वाहतूक शाखेकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. त्यामुळे शहर आयुक्तालयातर्फे ‘ट्रॅफिक वॉर्डन’हा उपक्रम राबविण्यात येणार असून, यासाठी वाहतूक नियंत्रणासाठी ट्रॅफिक वॉर्डन म्हणून काम करण्यास इच्छुकांना आवाहन करण्यात येत आहे.
त्यासाठी इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. मात्र, यासाठी इच्छुकांना कोणत्याही प्रकारचे मानधन दिले जाणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
शहरातील वाहतूक व्यवस्था नियंत्रित करण्याची आवश्यकता आहे. वाहतूक पोलीस शाखेकडे मनुष्यबळाचा अभाव आहे. त्यामुळे ट्रॅफिक वॉर्डन हा उपक्रम पोलीस आयुक्तालयाच्या माध्यमातून शहर वाहतूक शाखेत राबविला जाणार आहे.
ट्रॅफिक वॉर्डन म्हणून काम करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी आयुक्तालयामार्फत नोंदणी अर्ज भरून द्यायचा आहे. यात प्रामुख्याने उमेदवार १८ ते ५० वयोगटातील असावा, त्याची संपूर्ण माहिती, पोलीस ठाण्याची हद्द, शिक्षण, ट्रॅफिक वॉर्डनसाठी किती वेळ देणार यासह विविध माहिती अर्जाद्वारे द्यावी लागणार आहे. तसेच, कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल असल्यास त्याची माहिती व प्रतिज्ञापत्रही द्यावे लागणार आहे.
आयुक्तालयामार्फत https://froms.gle/qvys1pCNjzsH4Sum7 या लिंकवर उपलब्ध असलेला फॉर्म इच्छुकांनी ऑनलाईन भरून द्यावयाचा आहे. दरम्यान, ट्रॅफिक वॉर्डन म्हणून काम करू इचि्छणार्यांना कोणत्याही प्रकारचे मानधन दिले जाणार नसल्याचेही वाहतूक शाखेचे सहायक आयुक्त नितीन जाधव यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, २०१८ मध्ये वाहतूक शाखेचे तत्कालिन सहायक आयुक्त अजय देवरे यांनीही ट्रॅफिक वॉर्डन हा उपक्रम राबविण्यासाठीचा प्रयत्न केला होता. त्यासाठी ठराविक मानधन देण्याचे निश्चितही केले होते. परंतु ते मानधन पोलीस देणार की महापालिका यावरून सदरचा उपक्रम बारगळला होता.