नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): श्रावणातील तिसऱ्या सोमवारला विशेष महत्व असल्याने त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठीसाठी व ब्रम्हगिरीला फेरीसाठी राज्यासह देशभरातून भाविक येतात. लाखोंच्या संख्येने भाविक येत असल्याने त्यांच्या वाहतुकीसाठी एसटी महामंडळाकडून नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठी २७० जादा बससेवेची व्यवस्था करण्यात आली आहे.
नाशिक येथून नवीन बसस्थानक अर्थात ठक्कर बसस्थानक येथून दर पाच मिनिटाला बसेस सोडण्यात येणार असल्याची माहिती एसटीचे विभागीय वाहतूक नियंत्रक अरुण सिया यांनी दिली. बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर, कुशावर्त परिसरात श्रावणानिमित्त भाविकांनी गर्दी वाढती आहे.
श्रावणाच्या तिसऱ्या सोमवारी ही गर्दी उच्चांक गाठेल, असा अंदाज आहे. तिसऱ्या श्रावणी सोमवारी ब्रम्हगिरी प्रदक्षिणेला विशेष महत्व आहे. भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता सोमवारी त्र्यंबकेश्वरला जाण्यास खासगी वाहनांना बंदी असते.
राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने मागील दोन सोमवारचा अनुभव लक्षात घेता तिसऱ्या श्रावणी सोमवारी होणाऱ्या गर्दीच्या नियोजनावर लक्ष केंद्रीत केले आहे. त्र्यंबकेश्वरजवळील विविध भागातून त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची ने- आण करण्यासाठी २७० जादा बसचे नियोजन करण्यात आले आहे. तीन आणि चार सप्टेंबर रोजी या जादा बस सेवा मिळेल, प्रवाशांनी सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन विभागीय वाहतूक अधिकारी किरण भोसले यांनी केले आहे.
असे आहे जादा बसचे नियोजन:
नाशिक ते त्र्यंबकेश्वर १९०, आंबोली ते त्र्यंबकेश्वर: १०, घोटी ते त्र्यंबकेश्वर: १०, पहिने ते त्र्यंबकेश्वर: १०, खंबाळे ते त्र्यंबकेश्वर: ५० बसेस.