नाशिकरोड परिसरात मनपा आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांनी संयुक्तिकरित्या मोठी कारवाई केली आहे.
नाशिक (प्रतिनिधी): कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकरोड परिसरातील नाशिकरोड रेल्वे स्टेशन ते शिवाजी पुतळा यादरम्यान मनपा आयुक्त कैलास जाधव व पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी संयुक्तिक पाहणी केली. यावेळी परिसरातील दोन हॉटेलवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
नाशिक शहर व परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून हा प्रादुर्भाव कमी व्हावा व नागरिकांनी कोरोना बाबतच्या सूचनेचे पालन करावे तसेच व्यावसायिकांनी देखील नियम पाळावेत या हेतूने सध्या महापालिका प्रशासनाच्या वतीने विविध पातळीवर काम केले जात आहे.
याच पार्श्वभूमीवर शनिवारी रात्री अचानक मनपा आयुक्त कैलास जाधव व पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी रेल्वे स्टेशन ते शिवाजी पुतळा परिसरात पाहणी केली. रेल्वे स्टेशन व परिसरात उपस्थित असणाऱ्या नागरिक व प्रवाशांनी मास्क घातलेले आढळून आले.
या परिसरातील हॉटेलची पाहणी केली त्यात दोन हॉटेल मध्ये कोरोना बाबतच्या नियमांचे पालन केले जात नसल्याने हॉटेल भगत आहार भुवन व हॉटेल राधिका यांच्यावर प्रत्येकी पाच हजार रुपये अशी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
यावेळी आयुक्त कैलास जाधव यांनी हॉटेल व्यावसायिकांची संवाद साधून त्यांना नियमांची अंमलबजावणी करण्याबाबतच्या सूचना दिल्या. अन्यथा आपल्या आस्थापनावर सील करण्याचे कार्यवाही करण्यात येईल अशाही सूचना यावेळी त्यांनी दिल्या.
यावेळी विभागीय अधिकारी डॉ.दिलीप मेनकर यांना संबंधित ज्या अस्थापना नियमांचे पालन करीत नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून शासन निर्देशाप्रमाणे संबंधित अस्थापना बंद करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.
तसेच यावेळी बिटको हॉस्पिटल येथील एम.आर. आय. मशीन, सिटीस्कॅन मशिनची पाहणी केली व बिटको हॉस्पिटल मधील लॅब लवकरात लवकर सुरू करण्याच्या दृष्टीने कामाला गती देण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. आयुक्त कैलास जाधव यांच्या समवेत पोलिस आयुक्त दीपक पांडे,प्रभाग सभापती जयश्री खर्जुल,नगरसेवक रमेश धोंगडे ,जगदीश पवार, शहर अभियंता संजय घुगे,आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.बापूसाहेब नागरगोजे,कार्यकारी अभियंता उदय धर्माधिकारी, कोरोना कक्ष अधिकारी डॉ.आवेश पलोड, विभागीय अधिकारी डॉ.दिलीप मेनकर विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गोसावी आदींसह अधिकारी उपस्थित होते.