नाशिक (प्रतिनिधी): समृद्धी महामार्गावर खासगी ट्रॅव्हल बसला झालेल्या अपघातानंतर नाशिक आरटीओला उशिरा जाग आली असून उशिरा का होईना खासगी बसची तपासणी सुरू करत प्रवाशांच्या सुरक्षेकरिता आरटीओ रस्त्यावर दिसून येत आहे. खासगी बसेसच्या वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर बसेसची विशेष तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील स्लीपर बसचालक व मालक यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालय नाशिक येथे आपल्या बसेस पुनर्तपासणी करून प्रमाणित करून घ्याव्यात, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे यांनी केले आहे. स्लीपर बसचे अपघात रोखणे व आपत्कालीनप्रसंगी जीवितहानी टाळण्यासाठी उपाययोजना व सूचना जारी करण्यात आल्या आहेत. आरटीओकडून खासगी बस वाहतूकदारांसाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
बसचा आपत्कालीन दरवाजा सुस्थितीत असणे आवश्यक आहे. त्यासमोर व मागे कोणत्याही प्रकारचा अडथळा असू नये. आपत्कालीन दरवाजाच्या दर्शनी भागात हॅमर उपलब्ध होणे आवश्यक आहे. आपत्कालीनप्रसंगी बाहेर पडण्याचे मार्ग तसेच बसमधील अन्य बचावात्मक उपकरणांसबंधीची माहिती प्रवाशांना प्रवास सुरू होण्यापूर्वी देणे आवश्यक आहे.
याबाबतची चित्रफीत बसमध्ये प्रसारित करण्यात यावी, अथवा इ-मेल व सोशल मीडियाद्वारे बसमधील प्रवाशांना चित्रफीत प्रसारित करण्यात यावी. वाहन चालक हा मद्यप्राशन अथवा अंमली पदार्थांचे सेवन करून वाहन चालविणार नाही याची खातरजमा करूनच वाहनमालकांनी वाहनचालकास वाहन चालविण्यास देणे आवश्यक आहे. यासंदर्भातील सर्वस्वी जबाबदारी वाहनमालकाची असेल यांची नोंद घ्यावी.
वाहनचालक वाहन चालविताना मोबाइलचा वापर करणार नाहीत याचीही वाहन मालकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. वेळोवेळी वाहनचालकांनी नेत्र व आरोग्य तपासणी करून घ्यावी. दर दाेन तासांनी विश्रांती घेण्याबाबत वाहन चालकांना सूचना देण्यात येत आहे. वाहन चालविताना वेग मर्यादेचे उल्लंघन होणार नाही यादृष्टीने वाहनांना योग्य ते गती नियंत्रक बसविणे, वाहनात बसविण्यात आलेले स्पीड गर्व्हनर उपकरण सुस्थितीत व कार्यान्वित ठेवणे व वेळोवेळी त्याचे कॅलिब्रेशन करून घेणे याची जबाबदारी वाहनमालकांची आहे.
बसमधील अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत असावी. बसमध्ये क्षमतेपेक्षा अतिरिक्त प्रवाशांची वाहतूक करू नये. वाहन चालविताना वाहनचालकांनी लेनची शिस्त पाळणे व दोन वाहनांमध्ये सुरक्षित अंतर ठेवणे याबाबत वाहनचालकांना निर्देश देण्यात यावेत. वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र विहित मुदतीतमध्ये नूतनीकरण करून घ्यावे तसेच वाहन निरंतरपणे सुस्थितीत राहील याची वाहनचालकांनी व वाहनमालकांनी दक्षात घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शिंदे यांनी केले आहे.