नाशिक: अशोक खरात प्रकरणात पोलिसांचा इशारा; पीडितांची ओळख उघड करणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार

नाशिक। दि. २३ मार्च २०२६: भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात माध्यमे व सोशल मीडियावरून होत असलेल्या बेफिकीर वृत्तांकनावर नाशिक पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे. पीडित महिलांची ओळख उघड होईल अशा प्रकारचे वृत्तांकन केल्यास संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात येणार असल्याचा स्पष्ट इशारा विशेष तपास पथकाकडून देण्यात आला आहे.

सरकारवाडा पोलीस ठाण्यात अशोक खरात विरोधात विविध गुन्हे दाखल असून या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाकडून सुरू आहे. दरम्यान, काही न्यूज चॅनल्स, यूट्यूब पोर्टल्स, तसेच सोशल मीडिया हँडल्सवरून पीडित महिलेची ओळख उघड होईल असे व्हिडिओ आणि बातम्या प्रसारित केल्या जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मतदार यादी अद्ययावत आणि अचूक तयार करावी- मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम

काही ठिकाणी पीडितेचा चेहरा ब्लर करून व्हिडिओ दाखवले जात असले तरी तिचा पेहराव, अंगकाठी, उंची आणि हावभाव यांमुळे ओळख उघड होत असून संबंधित महिलेला मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम ७२ (१) नुसार पीडितेची ओळख उघड करणे हा दखलपात्र गुन्हा असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  चैत्र यात्रोत्सव: जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी घेतला सप्तशृंग गड येथे तयारीचा आढावा

अशा प्रकारच्या वृत्तांकनामुळे पीडित महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांवर मानसिक ताण वाढत असून त्यांचे दैनंदिन जीवनही विस्कळीत होत आहे. तसेच या प्रकरणात आणखी महिलाही पीडित असण्याची शक्यता लक्षात घेता तपास अत्यंत गोपनीय व संवेदनशील पद्धतीने केला जात आहे.

मात्र, ओळख उघड होण्याच्या भीतीमुळे इतर संभाव्य पीडित महिला पुढे येऊन तक्रार देण्यास घाबरत असल्याचेही पोलिसांनी नमूद केले आहे. याशिवाय काही सामाजिक संस्था आणि कार्यकर्ते पीडित व त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून माहिती उघड करत असल्याचेही समोर आले असून अशांवरही कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: जागतिक जल दिनानिमित्त ब्रह्मगिरीवर ‘स्वच्छ ब्रह्मगिरी अभियान’; ९८० किलो प्लास्टिक कचरा संकलित

पोलिसांनी सर्व माध्यम प्रतिनिधी, सोशल मीडिया हँडल्स आणि नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही पीडित महिलेची किंवा तिच्या कुटुंबाची ओळख उघड होईल असे वृत्तांकन करू नये. अन्यथा संबंधितांविरोधात गुन्हा नोंदवून कठोर कारवाई करण्यात येईल.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790