नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील कावनई किल्ल्याचा काही भाग कोसळला आहे. सुदैवाने यात कुठलीही जीवित आणि वित्तहानी झालेली नाही.
मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील घोटी या गावापासून पश्चिमेस ७ कि.मी. अंतरावर असलेल्या कावनई या गावावरून या किल्यास कावनई किल्ला असे ओळखले जाते. या किल्ल्याचा काही भाग आज खचला आहे.
इगतपुरी तालुक्यातील कावनई किल्ल्याचा वरील काही भाग कोसळला आहे. त्यात कोणत्याही प्रकारची जीवित व वित्तहानी झालेली नाही. इगतपुरीचे तहसीलदार घटना स्थळावर पोहचले आहेत, किल्ल्याच्या पायथ्याशी शेतात राहणा-या नागरिकांना गावात सुरक्षितस्थळी जाण्याबाबत सूचित करण्यात आले आहेत. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
तसेच जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी व तहसीलदार यांना आपआपल्या तालुक्यात सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी केले आहे.
तहसीलदार स्वतः त्या ठिकाणी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याबाबत सूचना दिल्या आहेत. सध्या पावसाचे वातावरण असल्याने ट्रेकर्सनेदेखील टेकडी, किल्ले किंवा धोकादायक ठिकाणे जाणे टाळावे. नागरिकांना काही अडचण असल्यास जिल्हाधिकारी कार्यालय आपत्ती व्यवस्थापन विभाग तसेच नाशिक जिल्हा पालकमंत्री कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.