नाशिक: चिमुकल्याने गिळली विक्सची डबी; श्वास गुदमरला; डॉक्टर देवदूत ठरले, प्राण वाचवले !

नाशिक (प्रतिनिधी): ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीचा प्रत्यय नांदगाव तालुक्यातील पानेवाडी येथील काकड कुटबियांना आला आहे. एक वर्षाच्या चिमुकल्याने खेळता खेळता व्हिक्सची डबी गिळली होती. कुटुंबियांना याबाबत समजताच त्यांनी ही डबी काढण्याचा प्रयत्न केला. मात्र गळ्यातून डबी निघत नसल्याने त्यांनी तातडीने रुग्णालयात धाव घेतली. यानंतर मनमाड येथील डॉक्टरांना चिमुकल्याच्या गळ्यातून डबी काढण्यात यश आले. मरणाच्या दारातून चिमुरडा परत आणल्याने कुटुंबियांना अश्रू अनावर झाले.

याबाबत अधिक माहिती अशी की, एक वर्षाचा चिमुरडा मल्हार काकड याने खेळता खेळता व्हिक्सची छोटी डबी गिळली. यामुळे चिमुरड्याला श्वास घेण्यास अडथळा निर्माण होऊ लागला. मात्र कुटुंबीयांना तातडीने त्यास मनमाडच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

चिमुकल्याने गिळली व्हिक्सची डबी:
डॉक्टरांनी शर्थीचे व तातडीचे उपचार करत गिळलेली डबी बाहेर काढल्याने त्यास मरणाच्या दारातून परत आणण्यास डॉक्टरांना यश आले. त्यामुळे डॉक्टरांच्या रूपात काकडे कुटुंबीयांनी देवदूत अनुभवला. चिमुरड्या मल्हारने डबी गिळल्यामुळे पालकांनी घरी ती काढण्याचा प्रयत्न केला मात्र त्याच्या घशात जखमा झाल्या होत्या.

अथक प्रयत्नाअंती डबी काढण्यात डॉक्टरांना यश:
या दरम्यान मल्हार याची ऑक्सिजन पातळी ३६-३७ पर्यंत खाली घसरली होती. तसेच फुफ्फुसाला होणारा ऑक्सिजन मार्ग देखील 80 ते 90 टक्के बंद झाला होता. अशा दुहेरी आव्हानाला सामोरे जात कल्पकतेने देवकी हॉस्पिटलच्या डॉ. राजपूत यांनी शर्थीचे प्रयत्न करत डबी बाहेर काढून मल्हार याचे प्राण वाचविले. त्यामुळे मल्हार या चिमुकल्यासाठी डॉ. राजपूत देवदूतच ठरले असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. डॉ. रवींद्र राजपूत, विजय राजपूत यांनी लरिंगोस्कोपचा वापर करत घशात अडकेली डबी बाहेर काढून मल्हारला जीवदान दिलं.

आपला एकुलता एक मुलगा या वेदनेतून, संकटातून सुखरुप बाहेर पडल्याचं दाम्पत्याला समजल्यानंतर त्यांना रडू कोसळून. त्यांचा जीव भांड्यात पडला.

मरणाच्या दारातून चिमुरडा मल्हार परत आणल्याने काकड कुटुंबीयांना डॉक्टरांचे आभार मानले. यावेळी कुटुंबियांना अश्रू अनावर झाले होते.

दरम्यान, लहान मुले खेळता खेळता काय करतील याचा भरवसा नसतो. अनेक वेळा लहान मुलांनी शाळेत किंवा अगदी घरात खडू, पाटीवरची पेन्सिल वगैरे नाकात घातल्याचा घटना घडल्या आहेत. नाशिकमध्ये या आधीही एका चिमुकल्याने डबी गिळल्याचा प्रकार घडला होता. त्यामुळे लहान मुलांना दुखापत होईल अशा वस्तू त्यांच्यापासून दूर ठेवाव्यात, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

2570 Total Views , 1 Views Today

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790