नाशिक (प्रतिनिधी): सिग्नल नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांवर आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. रिमोट ऑपरेटिंग सिस्टिमद्वारे इ-चलनाच्या माध्यमातून वाहनचालकांना ऑनलाइन दंड आकारला जाणार आहे. शहरातील ४५ सिग्नलवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच असणार आहे.
यातील मेहेर आणि सीबीएस सिग्नलवर प्रायोगिक तत्त्वावर दहा दिवसांत ऑनलाइन दंडआकारणी सिस्टिम सुरू होणार आहे. गुरुवारी (दि. २०) मेहेर, सीबीएस सिग्नलवर वाहतूक पोलिस आणि स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांना याची चाचणी घेतली.
सिग्नलवर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी ट्रॅफिक सिग्नलवर कॅमेरे बसविले आहेत. सिग्नल नियमांचे उल्लंघन केल्यास सीसीटीव्हीच्या कक्षेत आल्यानंतर संबंधित चालकाला सिग्नलवरील लाऊडस्पिकरद्वारे वॉर्निंग देण्यात येणार आहे. सिग्नल तोडून वेगाने पुढे गेला तर ट्रॅफिक कॅमेरे ऑटोमॅटिक चलनाद्वारे चालकाच्या घरच्या पत्त्यावर चलन पाठविले जाईल.
डेटा होणार जतन: ट्रॅफिक कंट्रोल रूममध्ये या यंत्रणेची सर्व कमांड आहे. विशेष डेटा एक्स्प्रेस सॉफ्टवेअरचा वापर करण्यात आला आहे. छायाचित्र आणि व्हिडीओचे पुरावे सुरक्षित ठेवले जाणार आहे. हे पुरावे न्यायालयासमोर सादर केले जातील.
नियम मोडणाऱ्यांना ट्रॅफिक कॅमेरा असा टिपेल:
सिग्नल नियम उल्लंघन केल्यास त्या व्यक्तीची नेमकी ओळख पटावी यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला बसविलेले कॅमेरे उच्च रिझोल्यूशनचे आहेत. तसेच हे कॅमेरे ६० डिग्रीपर्यंत वळू शकतात आणि आसपासचा परिसर पूर्णपणे कव्हर करू शकतात. यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची या कॅमेऱ्याच्या नजरेतून सुटका होणे खूपच अवघड आहे. त्यामुळे वाहतुकीचे नियम हे प्रत्येकाला पाळावेच लागतील.