नाशिक (प्रतिनिधी): गेल्या काही महिन्यांमध्ये नाशिक शहरात कोरोनाचे प्रमाण कमी झाले होते. त्यामुळे नागरिकांना नियमावलीचा जणू विसरच पडला. आणि जणू कोरोना गेला आहे अशा अविर्भावात नागरिकांनी सर्व नियमावली धाब्यावर बसवून मुक्तसंचार सुरु केला. आता पुन्हा नाशिक शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे भविष्यात रुग्ण संख्या अजून वाढल्यास कठोर निर्बंध लादून शहरात मिनी लॉकडाऊन करावे लागेल असा इशारा मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी दिला आहे.
सार्वजनिक ठिकाणी, लग्न समारंभ तसेच सार्वजनिक कार्यक्रमांच्या ठिकाणी तपासणीसाठी पथक तैनात करणार असल्याचे जाहिर केले. गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचे रुग्ण वाढायला सुरुवात झाली होती. मात्र नोव्हेंबर महिन्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. पण गेल्या काही दिवसांत परिस्थिती नियंत्रणात आली असली तरी अलीकडेच पुन्हा रुग्ण वाढू लागले आहेत. शाळा, महाविद्यालये, लग्न समारंभांना परवानगी दिली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर पुर्वीप्रमाणेच गर्दी वाढल्याने कोरोना रुग्णांचे प्रमाणही वाढू लागले आहे. यावर आयुक्त जाधव म्हणाले की, लग्न समारंभासाठी शंभर लोकांना परवानगी असताना नियम झुगारून गर्दी होत आहे. बाजारपेठेत मास्क न लावता नागरिक फिरत आहे. त्यामुळे नियमांच्या कडक अंमलबजावणीसाठी तपासणी पथके तैनात केली जाणार आहेत.