नाशिक (प्रतिनिधी): प्रवासी सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असूनही बस चालविताना अनेक चालक मोबाइलवर बोलताना आढळत असल्याचे गंभीर निरीक्षण राज्य मार्ग परिवहन महामंडळाने नोंदविले आहे. अशा बस चालकांवर कठोर कारवाई करा, असे आदेश महामंडळाच्या मुख्य सुरक्षा दक्षता अधिकाऱ्यांनी सर्व विभाग नियंत्रकांना दिले आहेत. त्यामुळे प्रवासादरम्यान मोबाइलवर बोलणे यापुढे चालकांना महागात पडणार आहे.
एसटी महामंडळाच्या बस प्रवाशांच्या सेवेसाठी अहोरात्र धावत असतात. सुरक्षित प्रवास हे महामंडळाच्या सेवेचे वैशिष्ट्य आहे. त्याच बळावर प्रवासाचे हक्काचे साधन अशी विश्वासार्हता महामंडळाने कमावली आहे. परंतु, अलीकडे मोबाइलवर बोलत बस चालविणाऱ्या चालकांचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.
सजग प्रवाशांद्वारे असे व्हिडीओ व्हायरल होत असल्यामुळे एसटी महामंडळाची प्रतिमा मलीन होत आहे.
मोबाइलवर बोलत निष्काळजीपणे बस चालविणाऱ्या चालकांमुळे अपघात होऊन प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यताही बळावली आहे. त्यामुळेच चालकांची अशी बेपर्वाई एसटी महामंडळाने गांभीर्याने घेतली आहे.
सध्या अबालवृद्धांना दिवाळीचे वेध लागले असून, लवकरच शाळा-महाविद्यालयांना सुट्या लागतील. सणासाठी कुटुंबीयांसह गावी जाण्याचे नियोजन घरोघरी सुरू झाले आहे. त्यामुळे महामंडळाने गर्दीच्या हंगामाचे नियोजन सुरू केले आहे. प्रवासी वाहतूक करताना दुर्घटना टाळण्यासाठी अधिक काळजी घेण्याचे निर्देश सर्व विभाग नियंत्रकांना देण्यात आले आहेत. बस चालविताना मोबाइलवर बोलू नका, हेडफोनचा वापरही टाळा असे निर्देश सर्व आगारांमधील चालकांना देण्यात आले आहेत. अशा निष्काळजी चालकांबाबत तक्रार प्राप्त झाल्यास, व्हिडीओ व्हायरल झाल्यास त्याची गंभीर दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करा, असे आदेश विभाग नियंत्रकांना मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
प्रवाशांची सुरक्षा ही चालकांची जबाबदारी आहे. बस चालवितेवेळी मोबाइलवर बोलून प्रवाशांचा जीव धोक्यात घालणे हा निष्काळजीपणा समजला जातो. याबाबत चालकांना वेळोवेळी सूचना दिल्या जातात. यापुढे अशा चालकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
– अरुण सिया, विभाग नियंत्रक