नाशिक। दि. १० जानेवारी २०२६: ग्राहकांना अखंडित,गतिमान व दर्जेदार सेवा देण्यासाठी तसेच विविध योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी वीज देयकांची थकबाकी वसुली अत्यंत आवश्यक आहे. थकबाकीमुळे ग्राहकाचा वीज पुरवठा नियमानुसार खंडित केल्यानंतर परस्पर किंवा बेकायदेशीर वीज जोडणी केल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश महावितरणचे कार्यकारी संचालक (पायाभूत आराखडा) दत्तात्रय पडळकर यांनी दिले.
शुक्रवार, दि. ९ जानेवारी २०२६ रोजी नाशिक परिमंडळातील सर्व अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांनी वीज देयक थकबाकी वसुलीसाठी थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यासाठी तातडीने विशेष मोहीम सुरू करण्याचे निर्देश दिले.
ही बैठक महावितरणच्या प्रशिक्षण व सुरक्षा केंद्र, एकलहरे येथील सभागृहात पार पडली. नाशिक परिमंडळातील घरगुती, औद्योगिक व वाणिज्यिक व इतर वर्गवारीच्या ग्राहकांकडे मोठ्या प्रमाणावर वीज देयक थकबाकी प्रलंबित आहे. यामध्ये
अहिल्यानगर मंडळ : ३ लाख ०५ हजार थकबाकीदार ग्राहकांकडे १११ कोटी २६ लाख रुपये.
मालेगाव मंडळ : ८२ हजार ८१७ थकबाकीदार ग्राहकांकडे २१ कोटी ०५ लाख रुपये.
नाशिक मंडळ : २ लाख ६० हजार थकबाकीदार ग्राहकांकडे ७५ कोटी ९८ लाख रुपये.
अशा प्रकारे नाशिक परिमंडळात एकूण ६ लाख ४८ हजार थकबाकीदार ग्राहकांकडे २०८ कोटी २९ लाख रुपयांची वीज देयक थकबाकी आहे.
त्यामुळे प्रत्येक महिनाअखेर शून्य थकबाकी मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी कसोशीने प्रयत्न करावेत, असे आवाहन श्री. पडळकर यांनी केले.
ग्राहक सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी आता देखभाल व दुरुस्ती आणि महसूल व देयके अशी स्वतंत्र विभागणी करण्यात आली असून, यामुळे ग्राहकांना अधिक जलद सेवा मिळणार आहे. ग्राहकांना अखंडित वीज पुरवठ्यासोबत वापरलेल्या विजेचे दरमहा योग्य रीडिंग घेऊन अचूक वीजबिल देण्यावर त्यांनी भर दिला. सर्व प्रकारच्या वीज जोडण्या व इतर सेवा ग्राहकांना ठराविक कालमर्यादेत व तात्काळ दिल्या गेल्या पाहिजेत असे निर्देश दिले.
ग्राहक सेवा व थकबाकी वसुली या कामांसाठी सर्व अभियंते व कर्मचाऱ्यांनी कार्यालयात वेळेत उपस्थित राहून दैनंदिन कामाचे नियोजन करावे व निर्धारित कालावधीत सेवा द्यावी व दिलेल्या प्रत्येक वीज युनिटची वेळेत वसूली करावी असे निर्देश देण्यात आले. तसेच विविध योजनांच्या माध्यमातून वीज गळती कमी करणे तसेच वाहिन्यांचे विलगीकरण गतीने पूर्ण करण्याचे आदेशही त्यांनी दिले. या बैठकीला नाशिक परिमंडळाचे प्रभारी मुख्य अभियंता देवेंद्र सायनेकर, अधीक्षक अभियंते राजेश थुल, जगदीश इंगळे तसेच नाशिक व मालेगाव मंडळातील कार्यकारी अभियंते, अधिकारी व एजन्सीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
![]()


