
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात गेल्या अनेक दिवसांपासून लॉकडाऊन होणार की नाही याबाबत संभ्रम होता. हा संभ्रम नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दूर केला आहे. नाशिकमध्ये तूर्तास तरी लॉकडाऊन होणार नाही आणि करायचा असल्यास पूर्वसूचना देण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.

“नाशिकमध्ये सध्या तरी लॉकडाऊनची गरज नाही, करायचा असल्यास पूर्वसुचना देऊनच निर्णय घेऊ असे सांगत होम क्वारंटाइन असलेल्या रूग्णांकडून नियमावलीचा भंग केला जात असेल, तर त्यांना कोविड केअर सेंटरला आणण्यात येईल.

रूग्णालयात बेडस मिळत नसल्याने रूग्णांचे हाल होत आहे त्यामुळे खाजगी रूग्णालयातील ८० टक्के बेडस अधिग्रहीत करण्याचे आदेश जिल्हयाचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आजच्या बैठकीत दिले.

तसेच पुढील तीन दिवसांत जिल्हा रूग्णालयात ३०० बेडसची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे सांगत पुन्हा सोमवारी (दि.५)आढावा घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नाशिकमधील वाढती कोरोना रूग्णसंख्या लक्षात घेता एक आठवडा निर्बंध यांची सक्ती करण्याचा निर्णय मागील बैठकीत घेण्यात आला होता. या परिस्थितीत नागरिकांनी सहकार्य न केल्यास २ एप्रिल रोजी लॉकडाऊनबाबत निर्णय घेण्यात येईल असा इशारा पालकमंत्री भुजबळ यांनी दिला होता.

त्यानूसार गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलतांना भुजबळ म्हणाले, आज जिल्हयातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. रूग्णालयात बेडस मिळत नसल्याने रूग्णांचे हाल होत असल्याच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत यापुढे खाजगी रूग्णालयातील ८० टक्के बेडस अधिग्रहीत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे बेड,ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरवर ची व्यवस्था वाढवणार असल्याचेही सांगण्यात आले.