नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): ड्रग्स तस्करांना लोकप्रतिनिधी फोन करताय का? त्याची चौकशी करा कारवाई करा. पालकमंत्री म्हणून मी जरी फोन केला असेल तर माझी सुद्धा चौकशी करा, असे सांगत ड्रग्स प्रकरणी येत्या आठ दिवसात पोलिसांची कारवाई झाली पाहिजे, असा सूचक इशारा दादा भुसे यांनी दिला आहे. त्याचबरोबर शहर परिसरातील झोपडपट्टी, पान टपरी, शाळा, कॉलेज, ढाबे आदींवर पोलिसांनी नजर ठेवून कारवाईचे आदेश मंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत.
नाशिक शहरातील ड्रग्ज प्रकरण दिवसेंदिवस चर्चेत असून आता दादा भुसे यांनी या संदर्भात बैठक घेत पोलिसांना आठ दिवसात कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. यावेळी नाशिकचे शिक्षण संस्था चालक, पोलीस अधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी ड्रग्स रॅकेटच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर ज्या ज्या घटना उघडकीस आल्या आहेत, त्याची चौकशी करण्याची सूचना करण्यात आली आहे.
यामागे कोणाचा वरदहस्त आहे का? कोणी फोन करतय का? पुण्यात देखील कोणी फोन केलाय का? तसेच पालकमंत्री म्हणून मी जरी फोन केला असेल तर माझी सुद्धा चौकशी करा, अशा सूचना पालकमंत्री दादा भुसे यांनी पोलिसांना दिल्या आहेत.
दादा भुसे पुढे म्हणाले की, पोलिसांनी या प्रकरणी थेट फिल्डवर उतरून कारवाई केली पाहिजे. असे झाले नाहीतर वरिष्ठांपर्यंत अहवाल सादर करून कारवाई करणार असल्याचा सूचक इशारा दिला. तसेच शहर परिसरातील ढाबे, झोपडपट्टी, पान टपरी अशा ठिकाणी अवैद्य धंदे चालतात. तिथे लक्ष ठेवावे, स्कॉड नेमावे.
शाळा कॉलेज सुटण्याच्या वेळी त्या त्या पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी तैनात करावे. तसेच शहरातील हुक्का पार्लरवर कारवाई केली जाईल. संबंधित महाविद्यालयांनी समिती नेमावी, तसेच असे काही आढळून आल्यास थेट पोलिसांना संपर्क करावा. त्याचबरोबर ड्रग्स प्रकरणी कारवाई करण्यासाठी नागरिकांना माहिती देण्यासाठी हेल्पलाईन करण्यात आली आहे. त्यावर नागरिकांनी आपल्याला माहिती असल्यास थेट हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
नाशिक पोलीस प्रशासनाची ड्रग्ससाठी हेल्पलाईन:
दरम्यान ड्रग्ज प्रकरणासंदर्भात नाशिक पोलीस प्रशासनाने हेल्पलाईन सुरु केली असून आता नागरिकांना काही माहिती असल्यास थेट 6262256363 हेल्पलाइनवर संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. तसेच या बैठकीत दादा भुसे म्हणाले की, ड्रग्स बाबत स्वतंत्र कक्ष स्थापन केला जाईल, सामान्य नागरिकांना गुन्हेगारी ड्रग्स विषयी माहिती देता येईल. तसेच काही तक्रार असल्यास 8263998062 या तक्रार देण्यासाठी व्हॉटसअप क्रमांकावर संपर्क साधावा असे सुद्धा पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.