नाशिक (प्रतिनिधी): दोन वर्षांपासून बंद कंपनीचा व्यवसाय कर रद्द करण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडून चार हजारांची लाच घेताना महिला व्यवसाय कर अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्या.
स्नेहल सुनील ठाकूर (५२, रा. आश्विन नगर नाशिक) असे लाच घेतलेल्या महिला अधिकाऱ्याचे नाव आहे. स्नेहल यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १४ दिवस न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
तक्रारदार यांची सिक्युरिटी सर्विसेस कंपनी दोन वर्षापासून बंद आहे. त्यामुळे कंपनीचा व्यवसायकर रद्द व्हावा यासाठी त्यांनी १३ सप्टेंबर रोजी व्यवसाय कर अधिकारी कार्यालयात अर्ज केला होता. व्यवसायकर रद्द करून देण्याच्या मोबदल्यात व्यवसाय कर अधिकारी स्नेहल ठाकूर यांनी तक्रारदार यांच्याकडे ५ हजारांची मागणी केली.
त्यामुळे तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असता, पडताळणीअंती विभागाने सापळा रचला.
त्यानुसार बुधवारी (ता.२०) कार्यालयात पंचासमोर ठाकूर यांनी तक्रारदाराकडून तडजोड करीत चार हजार रुपयांची लाच घेतली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ठाकूर यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले.
गुरुवारी (ता.२१) ठाकूर यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यांच्या घरझडतीतही काहीही आढळून आले नसल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सांगितले. विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक विश्वजीत जाधव यांच्या पथकाने कारवाई केली.