नाशिक शहराच्या सौंदर्यीकरणासाठी कलावंतासह तज्ज्ञांनी पुढे यावे- आयुक्त शेखर सिंह

नाशिक। दि. २७ डिसेंबर २०२५: नाशिक त्र्यंबकेश्वर येथे आगामी काळात होणाऱ्या कुंभमेळ्यानिमित्त राज्य शासनाच्या माध्यमातून विविध विकास कामे सुरू आहेत. या विकास कामांबरोबरच या दोन्ही शहरांचे सौंदर्यीकरण, संवर्धन महत्वाचे आहे. सौंदयीकरणात जिल्ह्याला लाभलेले अध्यात्म, ऐतिहासिक, सांस्कृतिक, पौराणिक वारश्याचे प्रतिबिंब उमटले पाहिजे. त्यासाठी या क्षेत्रातील कलावंत, तज्ज्ञ व्यक्तींनी पुढे येऊन सहकार्य करावे, असे आवाहन नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी येथे केले.

सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त कोट्यवधी भाविक नाशिकसह त्र्यंबकेश्वर येथे येतील. या कालावधीत शहर सौंदर्यपूर्ण आणि आकर्षक ठेवणे, सुशोभिकरण, दिवाबत्ती, हिरवेगार पट्टे, भित्ती चित्रे, सांस्कृतिक वैभवाची आकर्षक मांडणी यासह स्वच्छतेबाबत नियोजनासाठी प्राधिकरणाच्या सभागृहात आज दुपारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, उपविभागीय अधिकारी पवन दत्ता (इगतपुरी), सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल पाटील, नवनाथ सोनवणे, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या कार्यकारी अभियंता स्नेहल पगार, वास्तुविशारद राधिका रौनक भट्टड, निकेता काटके-व्हटकर, अंकुश जगताप, शिशिर शिंदे, अमित सारडा आदी उपस्थित होते.

⚡ हे ही वाचा:  महावितरणच्या ऑनलाईन सेवेमुळे ५८ हजार ग्राहकांना नाव बदलाचा तर १० हजार ग्राहकांना भारवाढीचा लाभ

आयुक्त श्री. सिंह म्हणाले की, नाशिक- त्र्यंबकेश्वर येथे प्राधिकरणाच्या माध्यमातून सौंदर्यीकरण केले जाईल. येणाऱ्या भाविकांना सौंदर्यीकरणातून अध्यात्म आणि जिल्ह्याच्या समृद्ध अशा वारशाचे दर्शन घडले पाहिजे. त्यासाठी रेल्वे स्थानक, त्र्यंबकेश्वर येथील दर्शन पथ, रामकाल पथ, या दोन्ही शहरांकडे जाणारे मार्ग, विमानतळ, उड्डाण पूल, प्रवेशद्वार, घाट, टेन्ट सिटी, बसस्थानक, ऐतिहासिक वास्तू आदींचे शास्त्रोक्त पद्धतीने आणि उपलब्ध साधनसामग्रीचा वापर करून सौंदर्यीकरण आवश्यक आहे. सौंदर्यीकरणाचे काम सिंहस्थ ध्वजारोहणापूर्वी झाले पाहिजे, असे नियोजन करावे. याबरोबरच प्रदर्शनी, शिल्पकला, लोककलेचा वापर करून सौंदर्यीकरणावर भर द्यावा. त्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन आणि सहकार्य केले जाईल. त्यासाठी ठिकाणे निश्चित करून प्राधिकरणाच्या सदस्यांसमवेत संवाद साधावा. या सौंदर्यीकरणातून कुंभमेळ्याच्या संदेश आणि जिल्ह्याचे एकत्रित दर्शन घडले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

⚡ हे ही वाचा:  नाशिक शहर कार्यक्षेत्रात 13 जानेवारीपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी

महानगरपालिका आयुक्त श्रीमती खत्री यांनी सांगितले की, महानगरपालिकेच्या माध्यमातून सौंदर्यीकरणाचे काम करण्यात येईल. त्यासाठी कलावंत, तज्ज्ञांनी सहकार्य, मार्गदर्शन करावे. अधीक्षक अभियंता श्रीमती शर्मा यांनी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सौंदर्यीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. यावेळी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, कलावंत, अभियंता, वास्तुविशारद उपस्थित होते.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790