बोधचिन्ह स्पर्धेला देशासह जागतिक पातळीवर अभूतपूर्व प्रतिसाद- कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह

नाशिक। दि. २६ डिसेंबर २०२५: नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027 साठी कुंभमेळा प्राधिकरणामार्फत बोधचिन्ह (लोगो डिझाईन) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेसाठी 20 डिसेंबर, 2025 पर्यंत प्रवेशिका सादर करण्याची मुदत देण्यात आली होती. या बोधचिन्ह स्पर्धेस देशासह जागतिक पातळीवरून अभूतपूर्व प्रतिसाद लाभला असून एकूण 3 हजार 67 प्रवेशिका प्राप्त झाल्या आहेत. अशी माहिती कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी दिली आहे.

प्राप्त प्रवेशिकांपैकी महाराष्ट्रातून 1 हजार 55 प्रवेशिका प्राप्त झाल्या आहेत. यात नाशिक जिल्ह्यातील 79 प्रवेशिकांचा समावेश आहेत. तर देशातील इतर राज्यांमधून 1 हजार 942 आणि परदेशातून 70 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला आहे. देशातील 25 पेक्षा अधिक राज्यांमधून स्पर्धकांनी सहभाग घेतला असून विशेषत: 18 ते 24 वर्षे वयोगटातील तरूणांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून आला आहे. या स्पर्धेसाठी प्राप्त प्रवेशिकांची निवड प्रक्रीया अत्यंत काटेकोर पद्धतीने राबविण्यात येणार असून निवड प्रक्रियेसाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील तज्ज्ञांचे ज्युरी पॅनॅल नेमण्यात येणार आहे.

⚡ हे ही वाचा:  महावितरणच्या ऑनलाईन सेवेमुळे ५८ हजार ग्राहकांना नाव बदलाचा तर १० हजार ग्राहकांना भारवाढीचा लाभ

या पॅनलमध्ये वास्तुकला, शैक्षणिक क्षेत्र, सांस्कृतिक अभ्यासक यासह दृश्य व ललित कला क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश असणार आहे. पॅनलच्या माध्यमातून प्राप्त प्रवेशिकांची बहुस्तरीय व सखोल छाननी करण्यात येणार असून जानेवारी 2026 अखेर या स्पर्धेचा अंतिम निकाल जाहीर होणार आहे.

दर बारा वर्षांनी नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणारा सिंहस्थ कुंभमेळा हा जगातील सर्वात मोठ्या आध्यात्मिक मेळाव्यांपैकी एक आहे. सिंहस्थ कुंभमेळासाठी निवड करण्यात येणारे बोधचिन्ह हे सिंहस्थ कुंभमेळा 2027 साठी नाशिक-त्र्यंबकेश्वरच्या आध्यात्मिक साराचे आणि भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रतीक ठरणार आहे. ते जागतिक पातळीवर तसेच सर्व व्यासपीठांवर श्रद्धा, उत्सव आणि कालातीत परंपरा व्यक्त करेल. या स्पर्धेला मिळालेला उदंड प्रतिसाद हा सिंहस्थ कुंभमेळा २०२७ विषयी जनमानसातील उत्सुकता, भावनिक नाते आणि सर्जनशील उत्साहाचे द्योतक असल्याची भावना सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी यानिमित्ताने व्यक्त केली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790