सिंहस्थ कुंभमेळा: नियोजन आणि पायाभुत सुविधा निर्मितीकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना

नाशिक, दि. 23 मे 2025: नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणारा सिंहस्थ कुंभमेळा हा महिला, बालके, ज्येष्ठ नागरिक यांची सुरक्षितता आणि त्यांना पुरविण्यात येणाऱ्या सोईसुविधांसाठी मानदंड म्हणून ओळखला जाईल, अशा पद्धतीने नियोजन करावे. गर्दीचे व्यवस्थापन आणि पायाभूत सुविधा निर्माण करताना या बाबींकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना राज्याच्या विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या.

विभागीय आयुक्त कार्यालय येथील सभागृहात उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी कुंभमेळा दरम्यान महिला व बालकांची सुरक्षितता, स्वच्छता आणि इतर अनुषंगिक विषयांबाबत आढावा बैठक घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या. विभागीय आयुक्त डॉ प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, मनपा उपायुक्त करिष्मा नायर, पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव आणि अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर आदींची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती.

उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, कुंभमेळ्याच्या अनुषंगाने सर्वसमावेशक आराखडा तयार करताना या ठिकाणी येणाऱ्या महिला, बालके, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आदींना सेवा पुरविण्याबाबत प्राधान्याने विचार व्हायला हवा. कोट्यवधींच्या संख्येने भाविक जेव्हा कुंभमेळ्यासाठी येतील तेव्हा त्यांच्यासाठी ज्या पायाभूत सुविधा अपेक्षित आहेत, त्यामध्ये या घटकांचा विचार व्हायला हवा. लाखोंच्या संख्येने महिला आणि बालकेही या कुंभमेळ्यात भाविक म्हणून येत असतात. त्यांची सुरक्षितता हा प्राधान्याचा विषय आहे. त्यामुळे पर्वणीच्या दिवशी तसेच इतर दिवशीही दळणवळण, निवास व्यवस्था असणाऱ्या ठिकाणी सुरक्षित वातावरण असणे अपेक्षित आहे. सिंहस्थ कुंभमेळा आराखड्यात याबाबींचा समावेश व्हायला हवा.

👉 हे ही वाचा:  जुन्या पीक विमा योजनेत सुधारणा करत नवीन पीक विमा योजना लागू - कृषीमंत्री ॲड माणिकराव कोकाटे

प्रयागराज येथील कुंभमेळा व्यवस्थापनाबद्दल अधिक चर्चा झाली. त्याच पद्धतीने नाशिक-त्र्यंबकेश्वर येथील कुंभमेळा हासुद्धा गर्दी व्यवस्थापन, भाविकांची सुरक्षितता, दळणवळण व्यवस्था, निवास व्यवस्था आदींसाठी ओळखला जावा, अशी अपेक्षा उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली. महिलांसाठी स्वतंत्र शौचालये, वस्त्रांतरगृहे, हिरकणी कक्ष आदींचा समावेश आराखड्यात असावा. महिला आणि बालके गर्दीतून हरवणार नाहीत, यासाठी विशेष काळजी आणि त्या अनुषंगाने सुरक्षित वातावरण निर्मिती, हेल्पलाईन आणि मदत कक्षांची स्थापना, कुंभमेळ्यात ठिकठिकाणी स्वच्छता, नदी परिसर आणि आसपासच्या परिसराची स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, भाविकांचे आरोग्य, आपत्कालिन परिस्थितीत करावयाच्या उपाययोजना आदींबाबत काटेकोरपणे नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

भाविकांना अधिक काळ पायी चालत जायला लागू नये यासाठी विशेष बसेसची व्यवस्था करणे, त्यामध्ये महिला आणि ज्येष्ठांसाठी राखीव आसनांची व्यवस्था आदींचा अंतर्भाव करण्याची सूचना डॉ. गोऱ्हे यांनी प्रशासनाला केली.

सायबर सुरक्षितता हा सुद्धा महत्वाचा घटक आहे. शहर आणि ग्रामीण भागात त्यादृष्टीने सुरक्षाविषयक उपाययोजना आवश्यक आहेत. केवळ नाशिक शहर आणि त्र्यंबकेश्वरच नव्हे तर आसपासच्या परिसरातील पर्यटनालाही कुंभमेळा सोहळ्यामुळे चालना मिळणार आहे. त्यामुळे नाशिक लगतच्या शिर्डी, शनि शिंगणापूर, सप्तश्रृंगीगड, घृष्णेश्वर, भीमाशंकर आदी ठिकाणी जाणारी दळणवळण व्यवस्था अधिक चांगली होईल, याकडे लक्ष द्यावे, असेही उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

👉 हे ही वाचा:  नाशिक: चहा विक्रेत्याला लुटणाऱ्या दोघांना अटक !

त्या म्हणाल्या की, महिला आणि बालकांच्या आरोग्यासह येणाऱ्या सर्वच भाविकांच्या आरोग्याची काळजी हा महत्वाचा घटक आहे. त्यासाठी महानगरपालिका, जिल्हा प्रशासनाने स्थानिक डॉक्टर्स असोसिएशन सोबत आणि खाजगी व धर्मादाय रुग्णालयांसोबत एकत्रित काम करण्याची गरज आहे. त्यासाठी ही रुग्णालये आणि असोसिएशनही नक्कीच पुढाकार घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, नदी प्रदूषण हा महत्वाचा भाग आहे. त्यामुळे गोदावरी स्वच्छता मोहिम अधिक वेग घेईल, यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. तसेच जल प्रदूषण करणाऱ्या घटकांना प्रतिबंध केला पाहिजे. घनकचरा व्यवस्थापनासाठी सुरु असलेले प्रकल्प वेळेत मार्गी लावले तर प्रदूषण कमी होईल. प्रशासनाने त्यादृष्टीने वेगाने कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

सिंहस्थ कुंभमेळा आराखडा तयार झाल्यावर तो विधीमंडळ सदस्यांसाठीही उपलब्ध करुन देता येईल. जेणेकरुन हा कुंभमेळा अधिक चांगल्या पद्धतीने करण्याच्या दृष्टीने राज्य सरकार आणि सर्व लोकप्रतिनिधी योगदान देऊ शकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

👉 हे ही वाचा:  नाशिक: प्रत्येक व्यक्तीने वृक्षारोपण करीत हरित कुंभसाठी सहकार्य करावे- जिल्हाधिकारी जलज शर्मा

नाशिक मधील मंदिरांची माहिती व्हावी एकत्रित:
नाशिक शहरात गोदावरी नदी काठी आणि शहरातही विविध मंदिरे आहेत. महापालिकेने याबाबत सर्वेक्षण करुन या मंदिरांची एकत्रित माहिती तयार करावी. त्या मंदिरांकडे जाणारे मार्ग व्यवस्थित करावेत. यामुळे शहरातील धार्मिक पर्यटनालाही बळ मिळेल, असे उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

भाविकांसाठी व्हावेत धार्मिक -सांस्कृतिक कार्यक्रम:
कुंभमेळा कालावधीत मोठ्या संख्येने भाविक नाशिक मध्ये येतील. त्यांना त्यांच्या निवासाच्या आसपासच्या परिसरात धार्मिक प्रवचन, सत्संग, सांस्कृतिक कला संगम असे कार्यक्रम आयोजित केले तर या भाविकांसाठी देशातील कला संस्कृतीचे दर्शन घडेल. यातून स्थानिक कलाकारांना संधी मिळेल, त्याचबरोबर देशाच्या विविध भागातून येणाऱ्या कलाकारांसाठी व्यासपीठ मिळेल, असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. यामुळे एकप्रकारे श्रद्धा आणि कला यांचा संगम याठिकाणी पहायला मिळेल आणि येणाऱ्या भाविकांना वेळेचा सदुपयोग झाल्याचेही समाधान मिळेल.

यावेळी विभागीय आयुक्त डॉ. गेडाम, जिल्हाधिकारी श्री. शर्मा, पोलीस उपायुक्त श्री. बच्छाव, अपर पोलीस अधीक्षक मिरखेलकर आणि मनपा उपायुक्त श्रीमती नायर यांनी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने विविध यंत्रणेने केलेल्या नियोजन आणि कार्यवाहीची माहिती दिली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790