Breaking

नाशिक: मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी केली कुंभमेळा विकास कामांची पाहणी

नाशिक। दि. ४ एप्रिल २०२६: नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त सुरू असलेल्या विविध विकास कामांची राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी आज दुपारी पाहणी करीत सविस्तर माहिती घेतली.

यावेळी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर, सहायक जिल्हाधिकारी डॉ. पवन दत्ता, पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे, महानगरपालिकेचे उपायुक्त प्रदीप चौधरी, शहर अभियंता संजय अग्रवाल आदी उपस्थित होते.

मुख्य सचिव श्री. अग्रवाल यांनी द्वारका सर्कल येथील भुयारी मार्ग, तपोवनातील लक्ष्मीनारायण मंदिराजवळ बांधण्यात येणारा समांतर पूल, कपिला संगम, साधुग्राम, गोदावरी नदी काठावर जलसंपदा विभागातर्फे सुरू असलेल्या नवीन घाटांच्या कामांची तसेच नाशिक महानगरपालिकेतर्फे तपोवन, आगरटाकळी, दसक-पंचक येथे सुरू असलेल्या मल जल शुद्धीकरण प्रकल्पांची पाहणी केली. त्यानंतर मुख्य सचिव श्री. अग्रवाल यांनी पांडव लेणीजवळील महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन, खत निर्मिती प्रकल्पांची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी महानगरपालिकेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाला भेट दिली तर राजुर बहुला येथे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वीज वितरण कंपनीतर्फे उभारण्यात येणाऱ्‍या वीज उपकेंद्राचीही मुख्य सचिव श्री. अग्रवाल यांनी पाहणी केली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत १२ लाखांची खंडणी मागणाऱ्या ४ जणांना अटक !

द्वारका सर्कल येथे महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता संदीप पंडागळे यांनी या प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली. द्वारका चौकातील पायाभूत सोयीसुविधांचे काम पूर्ण झाल्यावर वाहतुकीचे नियोजन कसे राहील याविषयीची माहिती मुख्य सचिव श्री. अग्रवाल यांनी जाणून घेतली.

महानगरपालिका आयुक्त श्रीमती खत्री, अतिरिक्त आयुक्त श्रीमती नायर, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता राजेश गोवर्धने, कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांनी तपोवन परिसरात कुंभमेळ्यानिमित्त आपापल्या विभागातर्फे सुरू असलेल्या विकास कामांची सविस्तर माहिती दिली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: अवकाळी पावसाने शहर जलमय; सखल भागांत पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय

मुख्य सचिव श्री. अग्रवाल म्हणाले की, नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी देश- विदेशातून मोठ्या संख्येने भाविक येतील. या भाविकांसाठी आवश्यक पायाभूत सोयीसुविधा निर्मिती शासनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. कुंभमेळ्यानिमित्त सुरू झालेली कामे वेळेत पूर्ण होतील याची दक्षता संबंधित विभागांनी घ्यावयाची आहे. याबरोबरच ही सर्व कामे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण होतील याचीही दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.

विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी सांगितले की, पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे सर्वतोपरी नियोजन करण्यात आले आहे. विविध विकास कामांना प्रशासकीय मंजुरी प्रदान करून विकास कामे सुरू झाली आहेत. ही विकास कामे वेळेत आणि गुणवत्तापूर्ण होण्यासाठी कुंभमेळा विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून सनियंत्रण करण्यात येत असल्याचे सांगितले. कुंभमेळा आयुक्त श्री. सिंह यांनी सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त कुंभमेळा प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध विकास कामांची माहिती मुख्य सचिव श्री. अग्रवाल यांना दिली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: खंडणी प्रकरणाला वेगळे वळण, फिर्यादीवरच अत्याचाराचा गुन्हा दाखल; १२१ आक्षेपार्ह व्हिडीओ

मुख्य सचिव श्री. अग्रवाल हे सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त नाशिक त्र्यंबकेश्वर येथे सुरू असलेल्या विविध विकास कामांची पाहणी करण्यासाठी व कामांचा आढावा घेण्यासाठी आजपासून तीन दिवस नाशिक दौऱ्यावर आहेत.

शनिवार, दि. 4 एप्रिल रोजी सकाळी ते पांडवलेणी येथे भेट देणार आहेत. त्यानंतर ते नाशिकरोड रेल्वे स्टेशन येथे रेल्वे विभागामार्फत सुरू असलेल्या कामांची पाहणी करतील. त्यानंतर ते धुळे रोडवरील पार्किंगची पाहणी करून रामकुंडावरील रामकाल पथच्या सुरू असलेल्या कामांना भेटी देऊन पाहणी करणार आहेत. तसेच स्मार्ट सिटी कार्यालयात सिंहस्थ कुंभमेळ्याचा आढावाही घेणार आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790