Breaking

सिंहस्थ २०२७च्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील रेल्वे स्थानकांची संयुक्त पाहणी

नाशिक। दि. १ एप्रिल २०२६: सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या पार्श्वभूमीवर तयारीचा आढावा घेण्यासाठी कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी आज नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांची संयुक्त पाहणी केली. रेल्वे विभाग आणि संबंधित यंत्रणांच्या समन्वयाने ही पाहणी करण्यात आली असून, पायाभूत सुविधांची स्थिती आणि प्रवासी हाताळणी क्षमतेचा आढावा घेण्यात आला.

या पाहणीत कसबे सुकेने, खेरवाडी, ओढा आणि देवळाली या स्थानकांचा समावेश होता. या ठिकाणी उपलब्ध सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक सुधारणा आणि वाढीव सुविधा याबाबत आढावा घेण्यात आला. देवळाली रेल्वे स्थानकावरील पाहणीदरम्यान कॅन्टोनमेंट बोर्ड देवळालीचे अध्यक्ष ब्रिगेडियर एन. आर. पांडे उपस्थित होते. यावेळी आयुक्त शेखर सिंह आणि ब्रिगेडियर पांडे यांच्यात स्थानक परिसरातील सुविधा, व्यवस्थापन आणि समन्वयाबाबत सविस्तर चर्चा झाली.

🔎 हे वाचलं का?:  गोदावरीतील पाणवेली निर्मूलनासाठी यंत्रणांनी कार्यवाही करावी : विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम

या पाहणीत विविध विभागांतील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यामध्ये रेल्वेचे वरिष्ठ विभागीय अभियंता (कुंभ) मनीष सिंह, भुसावळ विभागाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त चित्रेश जोशी, रेल्वे संरक्षण दल नाशिकचे निरीक्षक एन. पी. सिंह, नाशिक शहर पोलीस विभाग झोन १च्या उपायुक्त मोनिका राऊत, नाशिक उपविभागीय अधिकारी अर्पिता ठूबे, नाशिक ग्रामीण पोलीस निरीक्षक बिपीन शेवाळे, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नाशिक विभागीय वाहतूक अधिकारी किरण भोसले, जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी, प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी तसेच इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक शहरातील रस्त्यांच्या कामांमुळे २५ सिटीलिंक बसफेऱ्यांच्या मार्गात बदल

पाहणीदरम्यान प्रत्येक स्थानकावर पायाभूत सुविधांतील उणिवा, गर्दी व्यवस्थापन, विविध यंत्रणांमधील समन्वय आणि शेवटच्या टप्प्यातील (लास्ट माइल) संपर्क याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

प्लॅटफॉर्मची क्षमता वाढविणे, प्रवेश-निर्गम व्यवस्था सुधारणा, प्रवासी सुविधा, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, दिशादर्शक फलक आणि रस्ते वाहतुकीशी समन्वय या बाबींवर विशेष भर देण्यात आला. तसेच, शिखर काळात भाविकांची मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी सुरळीतपणे हाताळण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवरही चर्चा झाली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: एप्रिल २०२६ मध्ये ‘विशेष डिजिटल शेती शाळा’; शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन

यावेळी कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह म्हणाले, “सिंहस्थ २०२७ दरम्यान लाखो भाविकांचे आगमन रेल्वे स्थानकांमार्फत होणार आहे. त्यामुळे येथे सक्षम पायाभूत सुविधा, प्रभावी गर्दी व्यवस्थापन आणि सर्व यंत्रणांमधील समन्वय अत्यंत आवश्यक आहे. आजच्या पाहणीमुळे स्थानिक पातळीवरील गरजा स्पष्ट झाल्या असून, त्या वेळेत पूर्ण करून भाविकांना सुरक्षित आणि सुलभ प्रवासाचा अनुभव देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.”

पुढील काळात अशी पाहणी इतर महत्त्वाच्या ठिकाणीही करण्यात येणार असून, त्यातून मिळालेल्या सूचनांचा समावेश सिंहस्थ २०२७च्या सर्वंकष नियोजनात करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790