जयेश साबळे, महाराष्ट्र एक्सप्रेस ग्रुप, नाशिक
सध्या नाशिकचा वाढत्या कोरोना रुग्णांचा आलेख बघता नाशिक शहर हे देशातील सर्वात जास्त रुग्ण संख्या असलेल्या 10 शहरांपैकी एक असल्याचचं अहवालात समोर आलंय. त्यानुसार ही रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती, या बैठकीला महापालिका प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलिस अधिकारी देखील उपस्थित होते.
गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात वाढत्या कोरोना प्रादुर्भाव च्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कोरोनाबाबतच्या विषयांवर चर्चा करत महत्वाचे निर्णय घेण्यात आले. ज्यात शहरातील सर्व शाळा 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला, तसेच कागदी घोडे न नाचवता रस्त्यावर उतरून कोरोना नियम न पाळणाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी आपल्या अधिकाऱ्यांना दिले.
देशातील कोरोना हॉटस्पॉट असलेल्या 10 शहरांमध्ये नाशिकचे नाव आल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात नागरिकांनी सरकारने घालून दिलेल्या त्रिसूत्री न पाळल्यास पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ येईल. त्यामुळे नागरिकांनी काटेकोरपणे सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. दरम्यान कोरोना रुग्ण संख्या वाढत असली तरी कोरोना बेड उपलब्ध आहे. मात्र कोरोनाचा वाढता वेग बघता प्रशासनाने अडीचशेहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासन आपल्या परीने प्रयत्न करत असले तरी नागरिकांची साथ प्रशासनाला न मिळाल्यास गंभीर परिस्थिती उद्भवू शकते असे संकेत मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिले आहेत..
मागच्या वर्षीपेक्षा कोरोनाचा वेग अधिक वाढत असल्याने नाशिककरांची आणि प्रशासनाची धाकधूक वाढली आहे. हा वेग पाहता प्रशासनाच्या वतीने काही कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. आता नाशिक जिल्ह्यात लॉकडाऊन करायचे की नाही हे नागरिकांच्या हातात आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात नागरिकांनी कोरोना बाबतचे नियम न पाळल्यास लॉकडाऊनला सामोरे जावं लागणार आहे !