ग्राहकांऐवजी हॉटेल्सटेल्सकडून पार्किंगशुल्क; योजनेसाठी जागांची चाचपणी:हॉटेल्सलगत पार्किंगसाठी पालिका आयुक्तच सरसावले
नाशिक (प्रतिनिधी): शहरातील गंगापूररोड, कॉलेजरोड, त्र्यंबकरोड किंबहुना महत्त्वाचे रिंगरोड तसेच अन्य मार्गांवरील हॉटेल्समध्ये येणाऱ्या खवय्यांकडून रस्त्यावरच वाहने लावली जात असल्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीला शिस्त लावण्यासाठी पालिकेचे आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी आता, सशुल्क वाहनतळ निर्मिती करण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे.
रस्त्यावर महापालिका कोणत्या जागेत वाहने पार्क करू शकता याबाबत रेखांकन करून देणार असून त्याचे नाममात्र शुल्क हॉटेलचालकांकडून आकारले जाणार आहे. जेणेकरून नागरिकांवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या कोणताही कराचा बोजा पडणार नाही.
नाशिक शहरात हॉटेल्स थाटताना येणाऱ्या ग्राहकाच्या वाहनाचा विचार केला जात नसल्यामुळे रस्त्यावर विचित्र पद्धतीने वाहने लावली जातात. या सर्वांचा परिणाम म्हणून प्रमुख मार्गांवर वाहतूक कोंडी होत असून त्याचा सर्वसामान्य नाशिककरांना फटका बसतो.
शिवाय महापालिकेवर होणारी टीका लक्षात घेता आता आयुक्त डॉ. करंजकर यांनी सर्वप्रथम हॉटेल्समधील पार्किंगला शिस्त लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी येत्या सोमवारपासून शहरामधील हॉटेल्स कोणते तसेच, या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आहे का, रस्त्यावर कोणते हॉटेल्स पार्किंग करण्यास भाग पाडतात तसेच त्याची संख्या किती याची माहिती गोळा केली जाणार आहे.
पालिकेचा वाहतूक विभाग होणार अॅक्टिव्ह:
महापालिकेत वाहतूक विभाग निव्वळ नावाला असून आयुक्त करंजकर यांनी आता या विभागाला अॅक्टिव्ह करण्यासाठी उपायुक्त प्रशांत पाटील यांच्याकडे जबाबदारी दिली आहे. प्रामुख्याने, शहरामध्ये सशुल्क पार्किंग करता येईल अशा पद्धतीची ठिकाणी सर्वेक्षण करण्याची या विभागाकडे जबाबदारीअसेल.
सीबीएस परिसरात सशुल्क वाहनतळ:
मध्यवर्ती बसस्थानक अर्थातच सीबीएस या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा न्यायालय, भूमीअभिलेख विभाग, शासकीय कन्या विद्यालय, तसेच अन्य महत्त्वाची सरकारी कार्यालये आहेत. या ठिकाणी वकिलांचे चेंबर्स असून मोठ्या प्रमाणामध्ये हॉटेल देखील आहेत. शेजारील महात्मा गांधीरोड, अशोकस्तंभ, मेहेर या परिसरामध्ये देखील नागरिकांची मोठ्या प्रमाणामध्ये वर्दळ असते. ही बाब लक्षात घेत या ठिकाणी मोठे सशुल्क वाहनतळ उभारण्यासाठी जागेची चाचपणी सुरू आहे. शिवाजी उद्यान व स्टेडियम कॉम्प्लेक्स जवळील कोणत्या भागामध्ये वाहनतळ उभारता येईल याचा देखील विचार सुरू आहे.
सर्वेक्षणानंतर वाहनांसाठी जागा निश्चितीकरण:
“अनेक हॉटेल्सला पार्किंगच नसल्याचे लक्षात आले. रस्त्यावर विशेषतः वाहने लावली जात आहे. ही बाब लक्षात घेत आता रस्त्यावर कोणत्या जागेत पार्किंग करायची याबाबत रेखांकन करून दिले जाईल व त्यातून नाममात्र शुल्क घेऊन महापालिकेला महसूल मिळवून देता येईल. नागरिकांवर कोणताही वाहनांचा कर येणार नाही.” – डॉ. अशोक करंजकर, आयुक्त,