नाशिक (प्रतिनिधी): ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पावसाळी वातावरण ओसरेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. आर्द्रता कमी झाल्याने वातावण कोरडे होईल. त्यामुळे नाशिकसह मध्य महाराष्ट्र आणि कोकणात दिवसाचे तापमान सरासरीइतके राहील.
विदर्भात ते सरासरीपेक्षा कमी असेल. मात्र छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यात ऑक्टोबर हिट जास्त जाणवेल, असा अंदाज हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तविला आहे. आसामकडील ७ राज्यात व हिमालयाच्या पायथ्याशी म्हणजे सिक्कीम, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेशाचा पर्वतीय भाग येथे अति जोरदार पाऊस झाला. त्यावेळी महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, छत्तीसगड या राज्यात परतीच्या पावसाची शक्यता कमी होती.
परंतु ९ ते १३ ऑक्टोबर या कालावधीत आवर्त पर्जन्याची शक्यता आहे. त्यामुळे तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह परंतु किरकोळ पाऊस पडेल. सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे.