नाशिक (प्रतिनिधी): ‘स्वच्छ व सुंदर नाशिक’ अशी ओळख असलेल्या शहरात हवा प्रदूषणाचा मुद्दा गंभीर होत चालला असून हवा प्रदूषण कमी करण्यासाठी राष्ट्रीय स्वच्छ हवा कृती कार्यक्रम अर्थात एन-कॅप अंतर्गत हाती घेतलेल्या २९ इ-चार्जिंगपैकी १० चार्जिंग स्टेशन नवीन वर्षात अर्थातच जानेवारीत सुरू होणार आहेत.
केंद्र शासनाने एन कॅप योजनेमधून हवा प्रदूषण कमी करण्यासाठी जवळपास ८७ कोटींचा निधी दिला असून यातून पालिकेने यांत्रिकी झाडू, रस्त्यालगत ग्रीनरी, सायकल ट्रॅक, विद्युतदाहिनी तसेच आडगाव येथे ५० इलेक्ट्रिकल बसचा चार्जिंग डेपोही सुरू केला.
इलेक्ट्रिकल वाहनांना चार्जिंगची सुविधा सहज उपलब्ध व्हावी यासाठी १० कोटी खर्चातून २० ठिकाणी इ-चार्जिंग स्टेशन्स सुरू करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. २५% कमी दराने हे काम सर्वोटेक पॉवर सिस्टिम लि. या कंपनीने केल्यामुळे १० कोटींच्या कामासाठी ७.४३ कोटी रुपये खर्च झाले. बचत झालेल्या २.५७ कोटीतून ९ नवीन चार्जिंग स्टेशन उभारले जात आहेत.
या ठिकाणी इ-चार्जिंग स्टेशन: पालिका मुख्यालय:
राजीव गांधी भवन तसेच पश्चिम, पूर्व, नाशिकरोड, सातपूर, पंचवटी व सिडको विभागीय कार्यालये, तपोवन बस डेपो, अमरधाम फायर स्टेशन, सातपूर फायर स्टेशन, राजे संभाजी स्टेडियम (सिडको), बिटको हॉस्पिटल, कृषीनगर जॉगिंग ट्रॅक, भालेकर मैदान, प्रमोद महाजन उद्यान, महात्मानगर क्रिकेट मैदान, फाळके स्मारक, गणेशवाडी भाजी बाजार इमारत, लेखानगर मनपा जागा, अंबड लिंकरोडवरील मनपा मैदान या २० ठिकाणी चार्जिंग स्टेशन्सची उभारणी अंतिम टप्यात आहे.
![]()


