नाशिक (प्रतिनिधी): विधानसभेसाठी मतदानाला अकरा दिवस उरलेले असताना मतदारांना प्रलोभनासाठी विविध फंडे अवलंबले जात आहेत. रोकड तसेच मद्य, ड्रग्जच्या वापरासोबतच मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी विविध वितरणासाठी वाहतूक होणाऱ्या वस्तू जिल्हा प्रशासनाने हस्तगत केल्या आहेत. जिल्ह्यात शनिवार (ता.९) पर्यंत एक कोटी ७७ लाख ०३ हजार रुपये रोख रक्कमेसह एकूण ८ कोटी २९ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. यासंदर्भात जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी शनिवारी (ता.९) माहिती दिली.
मतदानाच्या दिवसापर्यंत विविध पथकांकडून हालचालींवर लक्ष ठेवत कारवाईचा धडाका सुरुच ठेवला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासन, जिल्हा प्रशासनातर्फे तैनात पथकांकडून विविध गतिविधींवर बारकाईने लक्ष आहे. तरीदेखील छुप्या मार्गांनी वस्तू, रोकडची वाहतूक केली जात असल्याचे समोर येते आहे. आचारसंहिता जाहीर झाल्यापासून ठिकठिकाणी नाकाबंदी करून तपासणी केली जाते आहे. तसेच प्राप्त तक्रारींनुसार कारवाईदेखील केली जाते आहे. आत्तापर्यंत तब्बल ८ कोटी २९ लाख रुपयांचा मुद्देमाल विविध ठिकाणांहून हस्तगत केलेला आहे.
पंचवीस लाखांचे अमलीपदार्थ हस्तगत:
व्यसनाधिनतेला प्रोत्साहन देताना ड्रग्जचाही वापर केला जात असल्याचे समोर आले आहे. विविध ठिकाणी कारवाई करत २४ लाख ५६ लाख रुपयांचा ऐवज हस्तगत केलेला आहे. यामध्ये इगतपुरीतून गांज्यासह २० लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. चांदवडमधून ४२ हजार, देवळाली १३ हजार, मालेगाव मध्य १ लाख ६५ हजार, मालेगाव बाह्य २ हजार, निफाडमधून २ लाख ०१ हजार रुपयांचे अमलीपदार्थ हस्तगत केलेले आहेत.
एक कोटी ३० लाखांचे सोने, चांदी हस्तगत:
जिल्ह्यातून सोने, चांदीसारखे एकूण १ कोटी ३० लाख ८२ हजार रुपये किमतीचे मौल्यवान धातूदेखील हस्तगत केले आहे. यामध्ये १ कोटी १४ लाख रुपयांचा मुद्देमाल नाशिक मध्यमधून तर १५ लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल सिन्नर मतदारसंघातून हस्तगत केला आहे.
अडीच लाख लिटर मद्य जप्त:
सर्वच पंधरा मतदार संघातून अवैध मद्यसाठा जप्त केलेला आहे. एकूण २ लाख ५९ हजार ९०० लिटर मद्यासाठा जप्त झालेला आहे. यामध्ये सर्वाधिक ७९ हजार ७२१ लिटर मद्य इगतपुरीत, तर ५५ हजार ८३९ लिटर मद्य बागलाण, नांदगावमधून ४१ हजार २६६ लिटर मद्य हस्तगत केले आहे
जप्त ऐवजाचा तपशील असा:
जप्त केलेली रोकड—- १ कोटी ७७ लाख ०३ हजार रुपये
जप्त केलेला मद्यसाठा- २ कोटी ३५ लाख ९१ हजार रुपयांचा
जप्त केलेले ड्रग्ज- २४ लाख ५६ हजार रुपयांचे
जप्त केलेले मौल्यवान वस्तू- १ कोटी ३० लाख ८२ हजार रुपये किमतीची
जप्त केलेल्या वस्तू- २ कोटी ६१ हजार ३९ हजार