नाशिक (प्रतिनिधी): बिल थकल्याने महावितरण कंपनीने ग्राहकांचे वीज कनेक्शन कायमस्वरूपी तोडले होते. मात्र, या ग्राहकांसाठी राज्य शासनाने अभय योजनेच्या माध्यमातून थकबाकी रक्कम एकरकमी भरल्यास त्यावरील व्याज आणि विलंब आकारात सूट दिली जाते.
नाशिक परिमंडळात या योजनेचा ६ हजार ६३३ थकबाकीदार ग्राहकांनी लाभ घेतला असून दुसरीकडे महावितरण कंपनीला देखील सात कोटी ५६ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी ३१ डिसेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली आहे.
नाशिक मंडळात ३ हजार ३५४ ग्राहकांनी ३ कोटी ५६ लाख, मालेगाव मंडळात ८४९ ग्राहकांनी ७१ लाख आणि अहिल्यानगर मंडळात एकूण २ हजार ४३० ग्राहकांनी ३ कोटी २८ लाख रुपयाचा भरणा केला आहे. त्यामुळे नाशिक परिमंडळात एकूण ६ हजार ६३३ ग्राहकांनी ७ कोटी ५६ लाख रुपयाचा भरणा करून थकबाकी भरून कायमची मुक्ती मिळवली आहे.
वीजबिलाचा वाद न्यायप्रविष्ट असलेल्या वीज ग्राहकांनाही या योजनेचा काही अटी व शर्तीवर लाभ घेता येईल.
मूळ बिलाच्या ३०% रक्कम भरून उर्वरित ७०% रक्कम सहा हप्त्यांत भरण्याची सवलत ग्राहकांना देण्यात आली आहे. घरगुती, व्यावसायिक आदी लघुदाब ग्राहक एकरकमी थकीत बिल भरतील त्यांना १०% सवलत देण्यात आली आहे तर उच्चदाब औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांना ५% सवलत दिली जात आहे.