मान्यताप्राप्त संस्थांना लसीकरण मोहिमेच्या प्रवाहात आणून लसीकरणाची व्याप्ती वाढवावी

नाशिक (प्रतिनिधी): देशभरासह जिल्ह्यात 16 जानेवारी पासून कोविड 19 साथरोग प्रतिबंधासाठी लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित लसीकरण मोहिम जलदगतीने पुर्ण करण्यासाठी जिल्ह्यातील मान्यताप्राप्त संस्थांना लसीकरण मोहिमेच्या प्रवाहात समाविष्ट करून, लसीकरणाची व्याप्ती वाढवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी  आज उपस्थित आरोग्य अधिकाऱ्यांना दिले.

आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित कोविड- 19 लसीकरण आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, पोलीस उपायुक्त संजय बारकुंड, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे, डॉ.श्रीनिवास,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कपिल आहेर, नोडल अधिकारी डॉ.निखिल सैंदाणे, डॉ.अनंत पवार, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे,  महानगरपालिका मालेगावच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.सपना ठाकरे आदी उपस्थित होते.

हे ही वाचा:  नाशिक: सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अमली पदार्थ नेण्यास बंदी

पुढे बोलताना जिल्हाधिकारी  मांढरे म्हणाले, ग्रामीण भागापेक्षा शहरात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शहरात लसीकरणाची व्याप्ती वाढविणे गरजेचे असून, खाजगी हॉस्पिटल व  मान्यताप्राप्त संस्था  येथे लसीकरण बुथची संख्या वाढवली तर  ही मोहिम लवकरात लवकर पूर्ण होईल.

जिल्ह्यातील सर्व  शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या लसीकरणाची टक्केवारी आरोग्य यंत्रणेच्या तुलनेत  समपातळीवर आणण्यासाठी  या शासकीय कार्यालयांशी प्रत्यक्ष संपर्क साधून,योग्य नियोजन करण्याच्या सूचनाही  जिल्हाधिकारी श्री मांढरे यांनी यावेळी दिल्या.

हे ही वाचा:  नाशिक: सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अमली पदार्थ नेण्यास बंदी

बूथच्या ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी लसीकरण ॲपच्या बाबतीत येणाऱ्या तांत्रिक अडचणींची माहिती शासनाला सादर करण्यात यावी, जेणेकरून  बुथच्या ठिकाणी एकाच वेळी होणारी गर्दी टाळता येईल, असेही  जिल्हाधिकारी मांढरे यावेळी बैठकीत सांगितले.

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790