गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेल्या मॉल्ससंदर्भात जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे.
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात सोमवारी म्हणजेच दि. २१ जून पासून मॉल्स सुरु करण्यास सशर्त परवानगी देण्यात आली आहे. येत्या सोमवारपासून मॉल्स पन्नास टक्के उपस्थितीत सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र हे मॉल्स सायंकाळी ४ वाजेपर्यंतच सुरु ठेवता येतील. मॉलमध्ये काम करणारे कर्मचारी तसेच ग्राहक या सगळ्यांना कोरोनाच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे यावेळी बंधनकारक आहे. शिवाय शनिवार आणि रविवार मॉल्स तसेच इतर आस्थापना पूर्णपणे बंद ठेवण्यात येतील.
शनिवार रविवारच्या विकेंड लॉकडाऊन मधून वैद्यकीय सेवा, मेडिकल स्टोअर्स, दुध, वृत्तपत्र विक्रेते, भाजीपाला व फळे विक्री यांना वगळण्यात आले आहे. तसेच हॉटेल व रेस्टॉरंट, फूड स्टॉल्स यांना फक्त होम डिलिव्हरीची परवानगी असेल. दि. ११ जून ते १७ जून २०२१ या कालावधीत नाशिक महानगरपालिकेसह जिल्ह्याचा कोरोनाचा पॉझिटिव्हिटी दर हा ४.३९ टक्के इतका आहे. तर ऑक्सिजन बेडवर रुग्ण उपचार घेत असल्याचे प्रमाण एकूण बेड संख्येच्या ९.३ टक्के इतके आहे.
राज्य शासनाद्वारे वेळोवेळी प्रत्येक आठवड्याचा गुरुवारी ऑक्सिजन बेड आणि कोरोना रुग्णसंख्येचा पॉझिटिव्हिटी दर याबाबत जाहीर आकडेवारीनुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे जिल्ह्यातील दोन्ही प्रशासकीय घटकांमध्ये अंमलबजावणी करावयाचे निर्बंधांच्या स्तरामध्ये वेळोवेळी आढावा घेऊन त्याप्रमाणे या आदेशामध्ये सुधारणा करण्यात येतील, असे कळविण्यात आले आहे.