नाशिक (प्रतिनिधी): पश्चिम बंगालसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर अवघ्या नऊ दिवसांत पेट्रोलचे दर पुन्हा एकदा ९९ रुपयांपार गेले आहेत. निवडणुका संपल्यानंतर ४ मे रोजी शहरात पेट्रोलचे दर ५ मे रोजी ९७.६० तर डिझेलचे दर ८७.३२ रुपये प्रति लिटरवर जाऊन पोहोचले होते. यानंतर अवघ्या ९ दिवसांमध्ये हेच दर अनुक्रमे ९९.१३ आणि ८९.२१ रुपयांपर्यंत वाढले आहेत.
विशेष म्हणजे निवडणुकीच्या काळात दीड महिने इंधनाचे दर देशभरात स्थिर होते. गतवर्षीपासून कोरोनामुळे लावलेला लॉकडाऊन आणि त्याचा मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका सर्वच घटकांना बसला आहे. मात्र यात सर्वसामान्य माणूस पिळवटला आहे. एका बाजूला कमी झालेले आर्थिक उत्पन्न, गेलेल्या नोकऱ्या व दुसऱ्या बाजूला किराणा, इंधन व वीज दरवाढ यामुळे मोडलेले कंबरडे अशी त्याची परिस्थिती झाली आहे. यामुळे गृहिणींना बजेट बसवणे अवघड झाले अाहे.