नाशिक: कांदा-टोमॅटो रस्त्यावर फेकत शेतकऱ्यांकडून अजित पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज एकदिवसीय नाशिक दौऱ्यावर असून त्यांच्या उपस्थितीत कळवण येथे शेतकरी कृतज्ञता मेळाव्यासह विविध कार्यक्रम होणार आहेत. सकाळी ओझर विमातळावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आगमन झाले. यावेळी त्यांचे मंत्री छगन भुजबळ यांनी स्वागत केले.

त्यानंतर अजित पवार हे ओझर विमातळावरून दिंडोरीकडे जात असताना दिंडोरी अवनखेड लखमापूर फाटा वणी येथे कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले. यानंतर अजित पवार वणी येथील सप्तशृंगी गडाकडे मार्गस्थ होत असताना वणी-कळवण चौफुलीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष शाम हिरे, आणि संतोष रेहरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी कांदा-टोमॅटो रस्त्यावर फेकत ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी अजित पवार यांना काळे झेंडेही दाखवण्यात आले.

या आंदोलनाच्या माध्यमातून कांदा व टोमॅटोच्या कोसळलेल्या भावा संदर्भात सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. याशिवाय शेतकऱ्यांनी कांदा निर्यात शुल्क मागे घ्यावी, टोमॅटोला चांगला भाव द्या, शेतकऱ्यांनी जगायचं कस, शेतकरी विरोधी सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा देत निषेध नोंदविला. मात्र, पोलिसांनी संबंधित शेतकऱ्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर अजित पवार यांचा ताफा सप्तशृंगी गडाकडे रवाना झाला.

दरम्यान, आगामी निवडणुकांच्या दृष्टीने पक्ष बांधणीसाठी अजित पवारांचा नाशिक दौरा महत्वाचा मानला जात असून यात त्यांनी विशेषत ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित केल्याचे दिसत आहे. तसेच अजित पवार यांच्या समवेत खासदार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार दिलीप बनकर यांच्यासह आदी नेते उपस्थित आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790