नाशिक (प्रतिनिधी): साडेतीन शक्तिपीठांपैकी आद्य स्वयंभू शक्तिपीठ व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र सप्तशृंग गडावरील सप्तशृंगी देवी मंदिर नूतनवर्षानिमित्त भाविकांच्या दर्शनासाठी रविवार (दि.२९) पासून २ जानेवारीपर्यंत २४ तास खुले करण्यात आले असल्याची माहिती सप्तशृंगी देवी ट्रस्ट प्रशासनाने दिली. यामुळे भाविकांना आपल्या वेळेनुसार दर्शन घेता येणार आहे.
सप्तशृंगी गडावर नाताळच्या सुट्ट्या, वर्ष समाप्ती आणि नूतन वर्ष प्रारंभ काळात भाविक भक्त नूतन संकल्प घेवून श्री सप्तशृंगी मातेच्या दर्शनाला गडावर मोठ्या प्रमाणात येतात. त्यामुळे वर्षाच्या शेवटी व सुरुवातीच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात राज्यासह परराज्यातून लाखोंच्या संख्येने भाविक येतात. गर्दी विरहित व योग्य नियोजनासह सुलभ दर्शन उपलब्ध होणे, यादृष्टीने विश्वस्त मंडळ व कार्यालयीन प्रशासनाने पूर्वनियोजन केले आहे. दरम्यानच्या काळात घाट रस्ता आणि सेवासुविधा देखील पूर्ववत असेल.
दर्शनाला २५ हजार भाविक…
सप्तशृंगी गडावर रविवारच्या सुट्टीचा योग साधत २५ हजार भाविकांनी सप्तशृंगी देवीचे दर्शन घेतले. गेल्या महिन्यापासून घाट रस्ता संरक्षक जाळीच्या कामामुळे भाविकांनी गडाकडे पाठ केल्याचा अनुभव व्यापारी व ट्रस्ट प्रशासनाने घेतला. सध्या घाट रस्ता खुला झाल्याने व नववर्षाच्या, नाताळाच्या सुट्टी असल्याने भाविकांची मांदियाळी बघायला मिळत असून व्यापारी वर्गाने २४ तास मंदिर दर्शनासाठी खुले उपक्रमाचे स्वागत केले आहे.