
नाशिक। दि. ३१ जानेवारी २०२६: मालसाणे, ता. चांदवड येथे होणाऱ्या णमोकार महोत्सवासाठी सर्व प्रशासकीय विभागांनी सुरक्षिततेची सर्वतोपरी दक्षता बाळगावी, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिल्या.
विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी आज सकाळी णमोकार तीर्थ येथे भेट देत पाहणी केली. त्यानंतर त्यांनी आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मुकेश ठाकूर, उपविभागीय अधिकारी कैलास कडलग, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळू पाटील, चांदवडचे माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल आदी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त डॉ. गेडाम म्हणाले, की णमोकार महोत्सवासाठी मोठ्या संख्येने भाविक येतील. त्यांच्यासाठी शासनस्तरावरून आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. महोत्सव सुरू होण्यापूर्वी त्यांची चाचणी करून घ्यावी. महोत्सव परिसरात नियमितपणे स्वच्छता राहील याची दक्षता घ्यावी. घनकचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी. अग्नी प्रतिबंधक उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असेही आयुक्त डॉ. गेडाम यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी णमोकार तीर्थ येथे जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध विकास कामांची माहिती दिली. तत्पूर्वी विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी हेलिपॅड, वाहनतळ, मुख्य मंडप, पाणीपुरवठा व स्वच्छता आदी कामांची पाहणी करून आढावा घेतला. यावेळी णमोकार तीर्थ समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
![]()


