नाशिक जिल्ह्यात इंधनाचा मुबलक साठा; अफवांना बळी पडू नका – जिल्हाधिकारी

नाशिक। दि. २६ मार्च २०२६: जिल्ह्यात कुठल्याही प्रकारचा इंधन तुटवडा नसून पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. ऑईल मार्केटिंग कंपन्यांकडून नियमित व अखंडित पुरवठा सुरू आहे. त्यामुळे इंधनाचा तुटवडा असल्याबाबत सोशल मीडियावर पसरत असलेल्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नागरिकाना केले आहे.

जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी सांगितले की, सध्या काही ठिकाणी सोशल मीडियावरील चुकीच्या माहितीमुळे नागरिक मोठ्या प्रमाणात पेट्रोल पंपांवर गर्दी करत आहेत. गरजेपेक्षा जास्त प्रमाणात इंधन खरेदी (पॅनिक बायिंग) केल्यामुळे काही पंपांवर तात्पुरत्या स्वरूपात इंधन संपल्याचे चित्र निर्माण होत आहे. मात्र, ही परिस्थिती केवळ तात्पुरती व कृत्रिम असून प्रत्यक्षात इंधनाचा कोणताही तुटवडा नाही. जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांना ऑईल मार्केटिंग कंपन्यांकडून सातत्याने इंधनाचा पुरवठा होत आहे. नवीन इंधनाचा पुरवठा नियमितपणे पोहोचत असल्याने नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्यास कोणतीही अडचण येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक येथील गृहनिर्माण कामांची चौकशी करून दोषींवर कारवाई करणार – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

नागरिकांनी जबाबदारीने व संयमाने वर्तन करणे अत्यंत आवश्यक आहे. गरज नसताना इंधन साठवून ठेवणे टाळावे, तसेच पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी करू नये. पॅनिक बायिंगमुळे इतर नागरिकांना त्रास होऊ शकतो व पुरवठा व्यवस्थेवर अनावश्यक ताण येऊ शकतो, याची जाणीव सुजाण नागरिकांनी ठेवावी. जिल्हा प्रशासनाकडून इंधन पुरवठ्यावर सातत्याने लक्ष ठेवले जात असून, संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून पुरवठा सुरळीत राहण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जात आहे.

🔎 हे वाचलं का?:  रेल्वे तिकीटांच्या नियमांत महत्वाचे बदल; एप्रिलपासून होणार लागू… जाणून घ्या सविस्तर…

तसेच, नागरिकांना कोणतीही शंका, अडचण किंवा तक्रार असल्यास संबंधित ऑईल मार्केटिंग कंपनी अथवा जिल्हा प्रशासनाच्या पुरवठा विभागाशी संपर्क साधावा. अधिकृत माहितीसाठी केवळ शासकीय माध्यमांवर विश्वास ठेवावा. असेही त्यांनी सांगितले. अफवांवर विश्वास ठेवणे टाळून, जबाबदार नागरिक म्हणून प्रशासनाला सहकार्य करणे ही काळाची गरज असल्याचे सांगत जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी नागरिकांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790