नाशिक। दि. २० जुलै २०२५: सिडको महामंडळातील विविध पदे भरतीसाठी मे. आयबीपीएस यांच्यातर्फे सोमवार २१ जुलै २०२५ रोजी सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत दोन सत्रात स्व. जी. एन. सपकाळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कल्याण हिल्स, अंजनेरी, त्र्यंबकेश्वर रोड, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक येथे परीक्षा होणार आहे.
सदरची परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारापासून चारही दिशेने १०० मीटर अंतरापर्यंत परीक्षेच्या दिवशी कोणतीही अनधिकृत व्यक्ती, वाहनास प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी निर्गमित केले आहेत.
तसेच या परिसरातील झेरॉक्स सेंटर, टेलिफोन, एसटीडी, आयएसडी बूथ, फॅक्स, सायबर कॅफे व तत्सम दूरसंचाराची साधने बंद ठेवण्यात येतील. परीक्षा केंद्र परसिरात डिजिटल डायरी, मायक्रो फोन, सेल्युलर फोन, कॉर्डलेस फोन, पेजर, मोबाईल फोन, कॅलक्युलेटर, वायरलेस सेट, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, अग्नी शस्त्रे, घातक शस्त्रे आदी जवळ बाळगण्यास, घेऊन फिरण्यास तसेच त्यांचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे.
यात अधिकृत परीक्षा बंदोबस्ताकरीता नियुक्त अधिकारी व अंमलदार, परीक्षार्थी, परीक्षेशी संबंधित अधिकारी व अंमलदारांचा देखील समावेश आहे. याशिवाय त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्याचे अधिकारी यांनी पोलिस बंदोबस्त नियुक्त करून गस्त घालावी. या आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल. सदरचा आदेश २१ जुलै २०२५ रोजी सकाळी ९ ते रात्री ९ या कालावधीत लागू राहील.