नाशिक। दि. १९ डिसेंबर २०२५: जिल्ह्यासह तालुक्याच्या ठिकाणी क्रीडा संकुलांचा क्रीडा स्पर्धा व क्रीडा उपक्रमांसाठी उपयोग होतो. ही क्रीडा संकुले वापरात व सुस्थितीत राहण्यासाठी त्यांचे उत्पन्न वाढीच्या दृष्टीने क्रीडा परिषदेसह सर्वसमावेशक आराखडा तयार करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात जिल्हा क्रीडा संकुल समिती आणि जिल्हा क्रीडा परिषदेच्या आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी श्री. प्रसाद बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे, क्रीडा व युवक सेवा नाशिक विभागाच्या उपसंचालक स्नेहल साळुंखे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, तालुका क्रीडा अधिकारी अविनाश टिळे, जिल्हा परिषद (प्रा.) शिक्षण विस्तार अधिकारी संतोष झोले, उपशिक्षणाधिकारी नरेश पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री प्रसाद म्हणाले की, क्रीडा संकुलांचे उत्पन्न वाढीसाठी विविध प्रकारच्या खेळांचे प्रशिक्षण आयोजित करणे, विविध कार्यक्रमांसाठी व पार्किगसाठी जागा उपलब्ध करून देणे यासारखे उपक्रम राबविता येतील. क्रीडा असोसिएशन सहभाग वाढविण्यासाठी व खेळाडूंना प्रोत्साहन मिळण्याच्या दृष्टिने जिल्ह्यातील एकत्रित बैठक घेवून वर्षभरातील कार्यक्रमांची आखणी करावी. क्रीडा व व्यायमाचे साहित्यासाठी सामाजिक दायित्व निधीसाठी प्रस्ताव तयार करून त्याची मागणी करावी. खेळाडू विद्यार्थ्यांना आवश्यक दाखले प्राप्त करून घ्यावेत. ‘मिशन महादेवा’ उपक्रमाच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू तयार करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती पाटील यांनी यावेळी कार्यालयामार्फत् राबविण्यात येणाऱ्या क्रीडा विषयक विविध योजनांची माहिती सादर केली. तसेच सन 2025-26 या वर्षातील विविध क्रीडा स्पर्धां आयोजनासाठी होणाऱ्या अंदाजित खर्चास मान्यता घेण्यासाठी आराखड्याचे सादरीकरण केले.
![]()

