नाशिक। दि. ६ मार्च २०२६: भारत निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या निर्देशानुसार एप्रिल 2026 पासून मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमास सुरुवात होणार आहे. या कार्यक्रमांतर्गत मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येणार आहे. यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) हे घरभेटी देऊन मतदारांची माहिती संकलित करणार असून मतदार नागरिकांनी त्यांना आवश्यक माहिती देवून मतदार यादी निर्दोष व पारदर्शक करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
आयोगाच्या निर्देशानुसार यापूर्वी 2002 मध्ये झालेल्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमात प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीत समाविष्ट असलेल्या मतदारांचे तसेच त्यांच्या कुटुंबातील 29 ऑक्टोबर 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार यादीत असलेल्या सर्व मतदारांची पुनः पडताळणी करण्यात येणार आहे. त्यासाठी BLO गृहभेटीद्वारे संबंधित मतदारांची पडताळणी करून अशी नावे 2024 च्या मतदार यादीशी जुळवणी करणार आहेत. याशिवाय 2024 च्या मतदार यादीतील अस्पष्ट, आकार विरहित व मानवी नसलेल्या (Blurred, non-dimensional and non-human) छायाचित्रांची पडताळणी करून योग्य छायाचित्रे अद्ययावत करण्याचे काम करण्यात येणार आहे. तसेच मृत, स्थलांतरित मतदारांची नावे वगळण्याबाबतची कार्यवाही देखील BLO मार्फत करण्यात येणार आहे.
नागरिकांनीही NVSP या पोर्टलवर लॉगिन करून स्वतःची व कुटुंबातील मतदारांची माहिती तपासावी. त्यामध्ये काही त्रुटी अथवा सुधारणा आवश्यक असल्यास त्याबाबत संबंधित BLO यांच्याशी संपर्क साधून आवश्यक कार्यवाही करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. प्रसाद यांनी केले आहे.
![]()

